मुंबई : "गोपीनाथ मुंडे यांचा सर्व जाती-धर्म, सर्व पक्षातील लोक, गोरगरीबांसोबत स्नेह होता. त्यामुळेच आज अनेक जणांनी गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. त्यामुळेच अनेक राजकीय नेतेही गडावर आले पण ते पक्षभेद विसरून. आजचा दिवस माझ्यासाठी नाही. तसाच तो माझाही दिवस नाही. तर आजचा दिवस लोकांच्या सेवेसाठी समर्पीत करणार असल्याचा संकल्प करत असल्याचे," मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. 


दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतिनिमित्त राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी, कर्करोग तपासणी, अशा विविध उपक्रमांचे जयंतिनिमित्त आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे बीड मधील गोपीनाथ गडावरही गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. 


गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर असंख्य समर्थकांनी हजेरी लावली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण केले. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "येथील कार्यक्रम संपल्यानंतर मी थेट उसाच्या फडात जाणार आहे. तेथे ऊस तोडणी कामगारांसोबत जास्तीत-जास्त वेळ घालवेन. त्यानंतर रक्तदान करेन. आजच्या दिवशी रक्त दानापेक्षा दुसरे कोणतेच मोठे दान असू शकत नाही. कारण कष्टकऱ्यांच्या विकासासाठी रक्त सांडेपर्यंत काम करण्याचा गोपीनाथ मुंडे यांचा वसा घेऊन मी काम करत आहे."
  
"आज गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीत शरद पवार साहेब सामील झाल्या सारखे मला वाटत आहे, अशा भावना पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. याबरोबरच उसाच्या काट्यावर लसीकरण करा असे आहवाहनही समर्थकांना केले. 
 
 "मी सत्ता बघितली आहे. त्याबरोबरच पराभव ही बघितला आहे. परंतु, सत्ता असो किंवा नसो मी काम करत राहिन, असे सांगताना सगळ्यात मोठा मुंडे साहेबाचा वारसा ही देणगी मला मिळाली आहे. " अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 


दरम्यान, गोपीनाथ गडावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर पंकजा मुंडे यांनी थेट उसाच्या फडात पोहोचून तेथील कामगारांसोबत संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. 


 


संबंधित बातम्या 


Gopinath Munde Birth Anniversary : 'काळीज जड होतंय; अप्पा, मी तुमचा शब्द पूर्ण करणार', धनंजय मुंडे भावूक