अहमदनगर : ऊसतोड कामगारांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ऊस कामगारांनी त्यांचं आंदोलन सुरुच ठेवावं. आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची संधी चालून आली आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांना विनंती आहे, हा तुमचा मतदारसंघ आहे. त्यांनी ऊसतोड कामगारांची अवस्था पाहावी आणि निर्णय घ्यावा, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. आज भगवानगडाच्या पायथ्याशी ऊस कामगारांचा मेळावा आयोजित केला होता, त्याठिकाणी प्रकाश आंबेडकर बोलत होते.


ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना दीडशे टक्के वाढीव भाव मिळावा म्हणून अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर संघटनांनी संप पुकारला आहे. ऊसतोड कामगारांनी आंदोलन करुन साखर कारखानदारांचे नाक दाबून ठेवले आहे. गरज तुमची नाही, तुम्हाला शेतात काम मिळत आहे. नाहीच मिळालं काम तर सरकारी योजना आहे. आपल्याकडे पर्याय आहेत. त्यामुळे तुम्ही आंदोलन सुरुच ठेवून मागण्या मान्य करुन घ्याव्यात. साखर कारखान्यांनी मशीन्सच्या साहाय्याने ऊस कापायचे ठरवले कारखान्याचं कोट्यवधींचं नुकसान होईल. मशीन ही सहा इंचवरून ऊस कापते. मात्र, जास्त साखर ऊसाच्या खालच्या पेरात असते. त्यामुळे ऊसतोड कामगारांना मशीनच्या कापणीइतका दर मिळू शकतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.


सध्या ऊसतोड मजुराला 1 टन ऊसामागे 238 रुपये मिळतात. तर आणि हार्वेस्टिंग मशीनला 400 रुपये देता. मुकादमाला कमिशन डबल करा. यांचा बोजा कारखान्यावर पडणार नाही कारण 20 टक्के इथेनॉल तयार केलं तर त्याचं नुकसान होणार नाही. मुख्यमंत्री यांना आवाहन आहे की सगळी बोर्ड बरखास्त करा आणि नवीन बोर्डाच इलेक्शन घ्या. आमच्या सोबत बसा आणि करारनामा करा. करारनामा हा सरकार आणि कारखानदार यांच्यासोबत झाला पाहिजे. हा लढा यशस्वी करण्यासाठी ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार यांनी  करारनामा झाल्याशिवाय एकानेही  गाडीत बसू नका, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.