सोलापूर : नगर जिल्ह्यातील भगवान गडावरील वादग्रस्त मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्यास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नकार दिला.

 

भगवान गडावर तुमचं भाषण होणार का, या प्रश्नावर त्यांनी फक्त हात जोडणंच पसंत केलं. बघू या काय होतंय असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

 

पंकजा मुंडे आज सोलापूर दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी याबाबत बोलणं टाळलं.

 

दसरा मेळाव्याचा वाद

गेल्या काही दिवसांपूर्वी भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरुन पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीतच झाला पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा वंजारी सेवा संघाच्या वतीनं देण्यात आला होता.

 

तर पंकजा मुंडेचे येथे भाषण होणार नाही, अशी भूमिका गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली होती.
दुसरीकडे पंकजा मुंडेच्या भाषणासाठी भाजरवाडी ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. भाजरवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी  गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी मंडलेल्या ठरावास विरोध करत, पंकजा मुंडेंना भाषण करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

ग्रमपंचायतीतील 9 पैकी 7 सदस्यांनी भाषणाला परवानगी देण्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. तसेच पंकजा मुंडे यांना दसरा मेळाव्यास भगवान गडावर येण्याचं भाजरवाडी सरपंचांनी निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा तिढा अधिकच वाढला आहे.