बीड : मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं सांगून मला अडचणीत आणण्यासाठी घाणेरडं राजकारण केलं जात आहे. पण मला काहीही व्हायचं नाही. तुमच्या मनातलं जे स्थान आहे ते कायम राहू द्या, असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या विरोधकांवर निशाणा साधला.

संत भगवान बाबा यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील सावरगावात त्या बोलत होत्या. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच सावरगावात आल्या. सावरगाव हे भगवान बाबा यांची जन्मभूमी आहे.

मुख्यमंत्री ही माझ्या नावाला चिकटलेली गोष्ट आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, राजकारणात मी सध्या कुठे उभी आहे, कसं पुढे जायचं हे मला माहीती आहे. पण अडचणीत आणण्यासाठी घाणेरडं राजकारण केलं जात आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

बाहेरचे लोक जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा काहीही वाटत नाही, त्याकडे दुर्लक्ष करते. पण माझ्या भुमीतले लोकं बोलतात तो माझा सन्मान असतो, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.