मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी  भाजपला राम राम ठोकल्यानंतर आता पंकजा मुंडे यांचं एक ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत शरद पवारांच कौतुक केलं आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये शरद पवारांचा उल्लेख करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.


आपल्या ट्वीटमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटते. पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्यांविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे.





परवाच्या दसरा मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. कारण धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आहेत. शरद पवारांशी आपले कसे जवळचे संबंध आहेत. फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडवाला मदत करतात, असंही पंकजा मुंडेंनी दाखवण्याचा प्रयत्न केला.

 एकनाथ खडसेंनी अखेर भाजपला राम राम ठोकला आणि पुन्हा एकदा फडणवीसांवर तोफ डागली. खडसेंच्या खदखदीचा कडेलोट झाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. पण गेल्या पाच वर्षांत भाजपत असे अनेकजण आहेत, ज्यांना फडणवीसांनी दुखावल्याचं म्हटलं जातं. त्यातील एक नाव म्हणजे पंकजा मुंडे.


मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री', असं पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणात बोलून दाखवलं आणि तिथून त्यांची पक्षात उलटी गिणती सुरू झाली. गोपीनाथ मुंडेंनंतर भाजपमधला बहुजनांचा चेहरा म्हणून पंकजाकडे पाहिलं जात होतं. मात्र, तरीही पंकजा यांना फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात दुय्यम दर्जाचं समजलं जाणारं महिला बाल विकास, जल संधारण आणि ग्राम विकास खातं मिळालं. त्यातही जलयुक्त शिवार हा फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने पंकजा यांच्याकडचं जल संधारण काढून राम शिंदे यांना देण्यात आलं. त्यामुळे पंकजा विरुद्ध देवेंद्र असा संघर्ष प्रथमच चव्हाट्यावर आला.