कोल्हापूर : दसरा मेळाव्यात झालेलं उद्धव ठाकरेंचं भाषण हे दसरा मेळाव्यातील नसून शिमग्यातील वाटत होतं अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना मुख्यमंत्रीपदाची गनिमा राखली नाही. त्यामुळं इतरांकडून का इच्छा व्यक्त करताय असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी एक प्रकारे नारायण राणे यांच्या भाषेचं समर्थनच केलं आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्यातील भाषणात शेण, गोमूत्र यांचा उल्लेख करत टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर आमचे नेते अमित शाह यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. जनतेशी संबंधित एक देखील मुद्दा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मांडला नाही. केवळ भाजपवर टीका करण्यासाठी भाषणाला उभा राहिले होते असं वाटत होतं.


हम किसी को टोकेंगे नही, लेकिन हमे कोई टोकेंगे तो हम छोडेंगे नहीं


उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून केलेली टीका चंद्रकांतदादा पाटील यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. आमच्यावर बेतालपणे टीका कराल तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. राज्यपालांवर टीका करताना उद्धव ठाकरे कोणती भाषा वापरतात? भाषणामध्ये शेण, गोमूत्र असे शब्द वापरले जातात.हे भाषण काय एखाद्या मुख्यमंत्र्याला शोभण्यासारखं नाही असंही चंद्रकांतदा पाटील यावेळी म्हणालेत.


मराठा आरक्षणावर हे सरकार गंभीर नाही- चंद्रकांत पाटील


मराठा समाजाच्या आरक्षणावरुन आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही.मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नसून साधं कोर्टात यांना वेळेवर पोहोचता येत नाही का असा सवाल दादांनी केलाय. सरकारनं स्थगितीनंतर केलेले प्रयत्न हे संशयास्पद आहेत. यांनी कधीही वकिलांशी चर्चा केली नाही. विरोधी पक्षाला चर्चेमध्ये सहभागी करुन घेतलं नाही. मुळाच स्थगिती मिळू नये म्हणून या सरकारने जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते केले नाहीत. केवळ मराठा समाजालाच हे सरकार वेठीस धरत नसून संपूर्ण महाराष्ट्राला हे सरकार वेठिस धरत आहे. पुन्हा कोर्टाकडून एक महिन्याची मुदत मिळल्यामुळं मराठा समाजातील तरुणांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.