मुंबई : राज्यात महिलांवरील छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी 'पॅनिक बटन चेन' आणणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.  सांगली जिल्ह्यातल्या कुरळप इथल्या मिनाई आश्रमशाळेतल्या आठ अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण झाल्यासंदर्भात शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना केसरकर बोलत होते.

'पॅनिक बटन चेन'मुळे महिला, मुलींवर अत्याचार होत असेल किंवा छेडछाडीच्या घटना होत असतील तेव्हा मदतीसाठी हे पॅनिक बटन दाबल्यानंतर पोलिसांना लोकेशन कळणार आहे. एक हजार रुपये किंमतीच्या या चेनवर सबसिडी देण्याचा सरकारचा विचार आहे, असे केसरकर म्हणाले.

यावेळी गोऱ्हे यांनी मुलींच्या आश्रमशाळांमध्ये सुरक्षा समित्या नेमण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण आणि शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी याचर्चेदरम्यान आश्रमशाळांमधल्या मुलींच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली.

या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना भटके विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री राम शिंदे यांनी यापुढे राज्यातल्या मुलींच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये महिला अधीक्षक नेमण्यात येतील अस स्पष्ट केलं. तसंच या आश्रमशाळांमध्ये विशाखा समित्या नेमण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं.