कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंगेसला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने आणि त्यांचे सुपुत्र धैर्यशिल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला. आता हातकणंगले मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून धैर्यशिल माने निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे.
माने यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. निवेदिता माने ह्या इचलकंरजी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत दोन वेळा राष्ट्रवादीकडून निवडून आल्या होत्या. तर त्यांचे सुपुत्र धैर्यशिल माने हे पक्षातील दिग्गज नेते मानले जातात. माने परिवारांचा जनमाणसात मोठा प्रभाव आहे. या प्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे महाआघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत. म्हणून त्या ठिकाणी धैर्यशिल माने यांना संधी नसल्याने हा प्रवेश झाल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांपासून माने पक्षावर नाराज होते. कोल्हापूर दौऱ्यादरम्यानही शरद पवारांनी त्यांच्या नाराजीची दखल घेतली नाही. त्यामुळे माने गट दुखावला गेला होता. तसेच शरद पवार जुन्या सहकाऱ्यांना विसरल्याची खंत माने यांनी व्यक्त केली आहे.
या प्रवेशामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशिल माने असा सामना पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
माजी खासदार निवेदिता माने यांचा राष्ट्रवादीला रामराम, शिवसेनेत प्रवेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Nov 2018 06:01 PM (IST)
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने आणि त्यांचे सुपुत्र धैर्यशिल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -