पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीसाठी विठूनामाच्या गजरात लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरी दुमदुमली असून आज संध्याकाळपर्यंत तुकोबा आणि ज्ञानोबांची माऊलींची पालखी पंढरीत दाखल होणार आहे.


पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीची मानाची विठ्ठलाची महापूजा यावर्षी मानाचे वारकरी करणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. एबीपी माझाला अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. महापुजेवेळी सोलापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसंच अन्य मंत्री उपस्थित राहतील, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. पंढरपुरात दरवर्षी आषाढीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होते. मात्र यासाठी मराठा समाजाचा विरोध होता. ''मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालय निर्णय घेऊ शकतं. काही संघटनांना हे माहित असूनही मराठा समाजाला उचकवण्याचं काम केलं जात आहे.

माझ्यावर दगडफेक करुन जर आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे,'' असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. ''महाराष्ट्रात वारीची परंपरा 800 वर्षांपासून आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील याला सरंक्षण दिलं. मुख्यमंत्र्यांनी पूजा करावी ही परंपरा आहे. मी तीन वर्षांपासून जातो. मात्र काही संघटनांनी याला विरोध केला. ही भूमिका चुकीची आहे.

विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. संरक्षणात ती केली जाऊ शकते. पण वारकऱ्यांच्या जीवाला धोका होईल म्हणून मी न जाण्याचा निर्णय घेतलाय,'' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.