Pandharpur Vitthal Rukmini Vivah : वसंतपंचमी मुहूर्तावर आज दुपारी बारा वाजता साक्षात परब्रह्म पांडुरंगाचा विवाहसोहळा संपन्न झाला. या आगळ्या वेगळ्या विवाहाची धामधूम  आज सकाळपासूनच मंदिर परिसरात सुरु झाली होती. यंदाही कोरोनाचे संकट असल्याने अगदी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा स्वर्गीय सोहळा संपन्न झाला.  लग्नवधू अर्थात जगतजननी रुक्मिणीमातेला पांढरी  शुभ्र रेशमी नऊवारी नेसविण्यात आली होती तर नवरदेव विठुरायाला देखील पांढरेशुभ्र रेशमी करवतकाठी धोतर, पांढरी अंगी आणि पांढरी पगडी  परिधान करून सजविण्यात आले होते. 


आज वसंत पंचमी असल्याने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात आली होती , वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. 


फुलांच्या महालाचे रूप देण्यात आलेल्या विठ्ठल सभा मंडपात विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्ती आणण्यात आल्या . भागवताचार्य अनुराधा शेटे या विठ्ठल रुक्मिणी स्वयंवराची कथा सांगताना त्यांनी रुक्मिणी स्वयंवराचा अध्याय सांगितला. यानंतर  साक्षात देवाच्या लग्नाची सुरुवात झाली. 


विठ्ठल आणि  रुक्मिणीच्या सजवलेल्या उत्सव मूर्तींच्यामध्ये आंतरपाट धरण्यात आला. वऱ्हाडीना अक्षता वाटून मंगलाष्टकाला सुरुवात झाली. खुद्द परमेश्वराच्या लग्नाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होता.   


शुभमंगल सावधान म्हणताच देवाच्या डोक्यावर भाविक अक्षता टाकत या आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्याचे साक्षीदार झाले.  शेवटच्या अक्षता पडताच आंतरपाट बाजूला काढत देव आणि मातेला पुष्पहार घालून आरती करण्यात आली. यावेळी कथाकारांच्या सुरात महिलांनी ठेका धरत देवाच्या लग्नाचा आनंद साजरा केला. 


सोहळ्यासाठी विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजावटीसाठी


लग्न सोहळ्यासाठी 20 प्रकारची देशी विदेशी अशी 6 टन फुले आणण्यात आली होती. यात 9 रंगांच्या शेवंती, 6 प्रकारचे गुलाब यांचा वापर विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजावट केली होती. या लग्न सोहळ्यासाठी देवाला पांढऱ्या रंगाची रेशमी अंगी, पांढऱ्या रंगाचे धोतर तर रुक्मिणी मातेला पांढऱ्या रंगाची रेशमी नऊवारी साडी असा पोशाख होता. रुक्मिणी मातेलाही अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात आली होती. तसे दरवर्षी देवाचा पोशाख खास असला तरी यंदा तो फॅशन डिझायनरने बनवून अर्पण केल्याने पहिल्यांदाच देवाला असा खास बनविलेला पोशाख विवाहात घातला होता.