पंढरपूर : संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपुरात दाखल झाली आहे. शेवटचं संयुक्त रिंगणही पार पडलं आहे. राज्यभरातून पंढरीच्या दिशेनं निघालेले वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. पांडुरंगाचे दर्शन व्हावं हीच सर्व वारकऱ्यांची इच्छा असते. त्यामुळे अवघी पंढरी वारकऱ्यांनी गजबजलेली पाहायला मिळत आहे. मात्र विठुरायाच्या दर्शनाची रांग तब्बल 7 किलोमीटर अंतरावर पोहोचली असून भाविकांना देवाच्या पायाजवळ पोहचायला 30 तासांचा अवधी लागणार आहे.



यंदा राज्यातील अनेक भागात समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने आषाढीला विक्रमी गर्दीचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. विठ्ठल भक्तांची रांग सात किमीवर पोहोचली आहे. महिनाभर विविध पालख्यांत चालत आलेल्या भाविकांना दर्शनासाठी तासंतास रांगेत उभं राहावं लागत आहे, मात्र कोणताही थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. फक्त विठुरायाच्या पायावर मस्तक ठेऊन दर्शन घेण्याची भावना लहान थोरांची दिसून येत आहे.


पंढरपुरात काल पावसाचे आगमन झाल्याने भाविक सुखावला आहे. दर्शन रांगेत मंदिर प्रशासनाने 25 लाख लिटर मिनरल वॉटर वाटपास सुरुवात केली असून यंदाचा दर्शन मंडप वॉटरप्रूफ करण्यात आल्याने भाविकांना पावसाचा त्रास जाणवत नाही. दर्शन रांगेत यंदा दोन प्रकारची कार्पेट टाकल्याने भाविकांना पायाला त्रासही जाणवत नाही.