पंढरपूर : एकतर्फी प्रेमाच्या त्रिकोणात वखारी येथील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. मात्र मोबाईलवर दिलेल्या मेसेजमुळे अवघ्या पाच तासात यातील आरोपीला पोलिसांनी (Pandharpur Police) अटक करून प्रकरणाचा उलगडा केला. वाखरी येथील एका शेतातील विहिरीत एका तरुणाचे प्रेत तरंगत असल्याची माहिती मिळाल्यावर पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी या तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यावर त्याच्या पोटाला नायलॉनच्या दोरीने मोठा दगड बांधून त्याला या विहिरीत टाकल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि इतर गोष्टीवरून तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता तो लखन गांडुळे या तरुणाचा मृतदेह असल्याचे समोर आले. हा तरुण याच मार्गावर एक हॉटेल चालवत होता. या वेळी या तरुणाच्या भावाने पोलिसात फिर्याद दिली असता लखनच्या एका मित्राने त्याच्या भावाला एक मेसेज व्हॉट्सअपवर पाठविल्याचे पोलिसांना आढळल्यावर त्यांनी या त्याच्या मित्राला चौकशीला बोलावले. यावेळी लखनचे मित्र युवराज सातपुते आणि तुषार मेटकरी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केला असता मुख्य आरोपी युवराज सातपुते याने खुनाची कबुली दिली.
लखन आणि युवराज हे दोघेही एका मुलीवर प्रेम करत होते. याबाबत युवराज याने लखन देखील त्याच मुलीवर प्रेम करत असल्याचे समजल्यावर त्याने लखनचा काटा काढण्याचे ठरवले. युवराज याने आपल्या मित्रांना सोबत घेत लखनला वखारी परिसरातील एका शेतात नेले. तिथे त्याने मित्रांच्या मदतीने लखनचा गळा दाबून त्याची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी लखनच्या पोटाला दोरीने मोठा दगड बांधून त्याचे प्रेत या विहिरीत टाकून दिले. मात्र युवराजच्या दुर्दैवाने लखन याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी विहिरीवर तरंगू लागल्याने या खुनाला वाचा फुटली.
युवराज याने लखन याच्या भावाला मोबाईलवर पाठविलेल्या तो मेसेजवर पोलिसांना संशय आला आणि केवळ पाच तासात या प्रेमाच्या त्रिकोणातील खुनाला वाचा फुटली. आज यातील दोन आरोपी युवराज आणि तुषार याला न्यायालयाने आज पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या खुनात युवराज याला अजून कोणी मदत केली याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र एकतर्फी प्रेमातील संशयावरून लखन गांडुळे याला आपला जीव गमवावा लागला.