अमहमदनगर : बालवयातच वडिलांचं निधन झालं, घरची परिस्थीती हलाखीची, धुनी- भांडी करून आईनं मुलांच्या शिक्षणासाठी धडपड केली. आईच्या याच कष्टाचं अहमनगर जिल्ह्यातील संगमनेर ( Ahmednagar Sangamner) येथील कल्याणी आहिरे (Kalyani Ahire) या मुलीच्या याशाने फळ मिळालं आहे. कल्याणी हिने जिद्दीने एमपीएससी ( MPSC ) परीक्षेत यश मिळवत आईचं स्वप्न पूर्ण केलंय. कल्याणी आहिरे हिने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलंय. सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता वर्ग एकच्या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत कल्याणीने यश मिळवलय. ही परीक्षा तीन टप्प्यात पार पडली. यातील शेवटचा टप्पा मे 2022 मध्ये पार पडला आणि 12 ऑगस्ट 2022 रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.  


संगमनेर शहरातील संजय गांधी नगर परिसरात झोपडीत अगदी पत्र्याच्या लहान घरात कल्याणी आपल्या आईसोबत राहते. तिच्या घरची परिस्थिती अगदी बेताची. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं. घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील आईने मुलांसाठी स्वप्न बघत त्यांना शिकविण्याचा निर्णय घेतला. दिवसा चार घरी धुनी भांडी आणि रात्री उशिरापर्यंत घरात मशीनवर ब्लाउज शिवण्याचं काम करत मुलांच्या संगोपनासाठी कल्याणीच्या आईने  प्रयत्न केले. घरची परिस्थिती बेताची असताना देखील कल्याणीने जिद्दीने अभ्यास केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवलं. कल्याणीच्या या यशाने आईच्या आयुष्यभर केलेल्या कष्टाला फळ मिळाले आहे.  


कल्याणीने तिचे प्राथमिक  आणि माध्यमिक शिक्षण सिद्धार्थ विद्यालय या शिक्षण नगर परिषदेचेच्या शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात आणि त्यानंतर अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून लागली. कल्याणीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून हे यश मिळवलंय. 


"मुलगी कल्याणी आणि मुलगा नवनाथ हे दोघेही लहानपणापासूनच शाळेत हुशार असल्याने दिवसभर धुनी-भांडी केल्यानंतर रात्री शिवणकाम असा माझा दिनक्रम अनेक वर्षापासून सुरू आहे. आज मुलीने मिळवलेले यश पाहून आनंद झाला असं सांगताना आई संगीता अहिरे यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी मुलांच्या लहानपणीच्या आठवणी सांगतांना गळा दाटून आला. आम्ही तिघे जण कॅमेरेचे ट्रायपॉड असून एकमेकांना कधी सोडत नाही, अशा भावना कल्याणीच्या आईने  एबीपी माझासोबत बोलताना व्यक्त केल्या.  


एकीकडे सगळ्या सुख सोयी असताना मुलांना यश मिळत नसताना दुसरीकडे घरातील हलाखीची परिस्थिती, स्पेशल क्लास नाही, राहायला एकच खोली या परिस्थितीत सुद्धा यश मिळू शकते हे कल्याणीने सिद्ध केलय.  


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI