पंढरपूर : विवाहबाह्य संबंधांत अडसर ठरणाऱ्या दोन चिमुरड्यांची जन्मदात्या आईनंच हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे. या प्रकरणी आरोपी माता सोनाली मिसाळला अटक करण्यात आली असून न्यायालयानं तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


सोलापुरातील माळशिरसच्या गोरडवाडीमध्ये संजय आणि सोनाली मिसाळ हे दाम्पत्य राहत होतं. त्यांना आदर्श हा 2 वर्षांचा तर प्रशांत हा 4 महिन्यांचा मुलगा होता. दोन मुलांची आई असलेल्या सोनालीचे हरी शिरतोडे या तरुणासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते.

लग्न मोडून हरीसोबत राहायला जाण्यासाठी तिला मुलांचा अडसर ठरत होता. तो दूर करण्यासाठी तिनं या पोटच्या दोन्ही मुलांची हत्या केली.

पती संजयने याविरोधात पोलिसात जाण्याचा प्रयत्न करताच सोनाली, तिचा प्रियकर, भाऊ आणि वडिलांनी संजयला धमकी देऊन दोन्ही मुलांचे मृतदेह पुरुन टाकले होते. याचा सुगावा पोलिसांना लागताच त्यांनी हे मृतदेह उकरुन काढत सोनाली आणि तिच्या वडिलांसह भावाला अटक केली, तर प्रियकर फरार आहे.