पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या महासोहळ्यात आज पहाटे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान यावेळी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याच्या विलास शेलवले यांना मिळाला.


आज पहाटे सव्वा दोन वाजता चंद्रकांत पाटील यांचे मंदिरात आगमन झाले. सुरुवातीला विठूरायाची आणि नंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली. पहाटे साडे तीन वाजल्यापासून भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. यावर्षी प्रथमच पूजा अतिशय कमी वेळेत उरकल्याने जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे.

 शेलवले दाम्पत्याला वर्षभर मोफत बसचा पास

शासकीय पूजेचा मान मिळालेले शेलवले दाम्पत्य व्यवसायाने शेतकरी असून गेल्या 15 वर्षांपासून कार्तिकी यात्रा करतात. यावेळी नोटांच्या गोंधळामुळे सुरुवातीपासून अडचणींना तोंड देत हे दाम्पत्य पंढरपूरला पोहचले. दुपारी बारा वाजताच्या दरम्यान दर्शन रांगेत उभे असलेल्या शेलवले दाम्पत्याला मानाचा वारकरी होण्याचे भाग्य मिळाले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने महसूल मंत्री आणि शेलवले कुटूंबाचा सत्कार करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाने त्यांना वर्षभर मोफत प्रवासाचा पास देऊन गौरव केला.