Kolhapur Crime : कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून टोळीयुद्ध सुरु झाल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांत दोन सराईत गुंडांचा पाठलाग करून खून झाल्यानंतर कोल्हापूर पोलिस सतर्क झाले आहेत. दहशत माजवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या फाळकूटदादांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय करू नका, अशा सक्त सूचना पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीस पोलिस उपधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, स्नेहा गिरी यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी उपस्थित होते.
बलकवडे म्हणाले, प्रत्येक भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार पाहून त्यांच्यावर लक्ष ठेवावे. चौकांमध्ये, कॉलेज आणि क्लासेसच्या परिसरात फिरणाऱ्या उपद्रवी टोळ्यांवर कारवाई करा. ज्यांच्यावर मारामारीचे गुन्हे आहेत आणि ते पुन्हा पुन्हा त्याच गुन्ह्यात सापडतात त्यांच्यावर १ वर्षाची एम.पी.डी कारवाई केली पाहिजे. संवेदनशील भागामध्ये कोम्बिग ऑपरेशन केले पाहिजे. संघटित स्वरूपात गुन्हेगारी करणाऱ्यांचे मोक्याचे प्रस्ताव तयार करा.
तरुण, तरुणींच्या सोशल मीडियावर सायबर गुन्हे अन्वेषण शाखेने लक्ष ठेवावे. गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी जर आक्षेपार्ह स्टेटस किंवा पोस्ट केल्या तर त्यांच्यावर कारवाई करावी, असेही बलकवडे यांनी या बैठकीत सांगितले.
सोशल मीडियातून आव्हान
सोशल मीडियातून व्हिडिओ, रिल्स करून एकमेकांना धमकी देण्याचे तसेच आपण गल्लीत श्रेष्ठ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न या सडक छाप गुंडांकडून केला जात आहे. वचक निर्माण करण्यासाठी सुद्धा असे प्रकार घडत आहेत. सोशल मीडियात देण्यात येणारी धमकी आता रस्त्यावर येऊन पोहोचली आहे.
दीड महिन्यात दुसऱ्यांदा सराईत गुन्हेगाराचा खून
कोल्हापूर पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगाराचा भररस्त्यात पाठलाग करून रविरात्री रात्री निर्घृण खून करण्यात आला. गँगवॉरमधून ही घटना झाल्याचे बोलले जात आहे. कुमार शाहूराज गायकवाड (वय 22, रा. मोरेवाडी, कोल्हापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. टाकाळा खणीजवळ ही घटना घडली. हल्लेखोरांनी 17 वार करत कुमारचा खून केला.
यापूर्वी,जामिनावर सुटलेल्या गुंडाचा पाठलाग करून गुंडाचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर शहरातील यादवनगरमध्ये 24 सप्टेंबर रोजी घडली होती. चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय 25) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणातील फरार आरोपी श्रीधर उर्फ दादू बाळकृष्ण पोवारच्या (रा. दौलत नगर, राजारामपुरी कोल्हापूर) मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या