Pandharpur Corridor : पंढरपूर कॉरिडॉर (Pandharpur Corridor) आणि विकास आराखड्याला टोकाचा विरोध होताना दिसत आहे. शासनाकडून हा विकास आराखडा राबवण्यासाठी टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाल्यानं नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये संताप आहे. आज सकाळपासून विठ्ठल मंदिराच्या (Vitthal Temple) पश्चिम द्वारसमोर शेकडो व्यापारी आणि परिसरातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. यामध्ये 'नो कॉरिडॉर' असे काळे फलक आणि काळे झेंडे हाती घेतले आहेत. तसेच बाधित नागरिक शासन आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आमच्यावरील अन्याय दूर न झाल्यास आषाढीला कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचं धक्कादायक वक्तव्य संघर्ष समितीचे अध्यक्ष रामकृष्ण महाराज वीर आणि आदित्य फत्तेपूरकर यांनी केलं आहे.


शासन जबरदस्तीनं सर्व गोष्टी इथे करण्याचा प्रयत्न करत आहे. या कॉरिडॉर आणि विकास आराखड्यामुळं हजारो लोक बेघर होणार आहेत. जुने पुरातन वाडे नष्ट होणार आहेत. त्यामुळं जबरदस्तीनं हा कॉरीडर राबवला तर आम्हाला देखील जत तालुक्याप्रमाणं निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही यावेळी रामकृष्ण महाराज वीर यांनी दिला आहे. 


एका बाजूला नागरिकांशी चर्चा दुसऱ्या बाजूला टेंडर प्रसिद्ध


एकाबाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री कधी जत तरी कधी सोलापूर अक्कलकोट कर्नाटकात जोडण्याची भाषा करत आहेत. अशातच आज पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर विरोधी आंदोलनकर्त्यांनी आमच्यावरील अन्याय दूर न झाल्यास आषाढीला कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा मतप्रवाह तयार होत असल्याचे धक्कादायक वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच आज आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मंदिर परिसरात भविष्यात भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देता याव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखडा आणि माऊली कॉरिडॉर राबवण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. एका बाजूला शासन या बाधित नागरिक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करत आहे. तर दुसऱ्या बाजूला यासाठीचे टेंडर प्रसिद्धीस दिल्यानं नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. आज सकाळपासूनच विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर शेकडो व्यापारी आणि परिसरातील नागरिक स्त्री पुरुषांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. यामध्ये नो कॉरिडॉर असे काळे फलक आणि काळे झेंडे घेऊन हे बाधित नागरिक शासन आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.


वाद चिघळण्याची शक्यता


दरम्यान,  पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्याला विरोध करणाऱ्या संघर्ष समितीचे अध्यक्ष रामकृष्ण महाराज वीर यांनी आता जर शासनाने हा आराखडा मागे नाही घेतलं तर पुढच्या आषाढीच्या पूजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलवावे लागेल असा मतप्रवाह बनत असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळं आता हा वाद अजून चिघळत जाण्याची चिन्हे आहेत. एका बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज महाराष्ट्राच्या भूमीवर वेगवेगळे दावे करत असताना या आंदोलकांच्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने स्थानिकांना विश्वासात न घेता या आराखड्या संदर्भात निर्णय घेतल्याचे आंदोलकांनी म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


पंढरपूर कॉरिडॉरचा गोंधळ! एकाबाजूला चर्चा दुसरीकडे विकास आराखड्यासाठी निविदा, नागरिकांमध्ये रोष