पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे देशातील परिस्थिती अत्यंत भीषण होत चालली आहे. देशातसह राज्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरही ताण येऊ लागला आहे. अशातच अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांना ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण करावी लागत आहे. अनेकांना तर ऑक्सिजनअभावी आपले प्राण गमवावे लागत आहेत. पंढरपुरातही काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 


कोरोना संकाटामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांची तडफड सुरु झाली आहे. रोज शहर आणि ग्रामीण भागातून ऑक्सिजन मिळविण्यासाठी आता रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ सुरु असून आमच्या रुग्णाला श्वास घेता येत नाही, ऑक्सिजन देता का? अशा पद्धतीच्या विनवण्या आता रुग्णांचे नातेवाईक करताना दिसत आहेत. पंढरपुरात पोट निवडणुकीनंतर कोरोनाने अतिशय अक्राळविक्राळ रूप धारण केले असून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्रशासन देखील हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा ऑक्सिजन कसा उपलब्ध करायचा? या काळजीत असल्यानं दिवसागणिक मृत्यूचा आकडाही वाढत चालला आहे.


आम्हाला रेमडेसिवीर नको, लसही नको. पण किमान मारणाऱ्या रुग्णाला शेवटचा श्वास घ्यायला ऑक्सिजन तरी द्या, अशा पद्धतीची आर्जव आता रुग्णांचे नातेवाईक करताना दिसत आहेत. या परिस्थितीवर राजकीय नेतेही आता हतबल झाल्याचे चित्र असून सोलापूरचे विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी आता काहीही करून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनाचे होऊन गेले असून मृत्यूचा आकडा 2800 पर्यंत गेल्याने परिस्थिती खूपच गंभीर बनल्याचे त्यांनी सांगितले. या आणीबाणीच्या परिस्थितीत प्रशासनाने कडक भूमिका घेत जिल्ह्यातील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा पुरेसा करण्याचे आवाहन केले आहे. ऑक्सिजन जपून वापरा असा सल्ला रुग्णांसाठी असून प्रत्येकाला गरजेनुसार ऑक्सिजन दिला तरच त्याचे प्राण वाचणार असल्याचेही परिचारक यांनी सांगितले आहे.


सोलापूरला मिळणार लिक्विड ऑक्सिजन कोटा निम्म्याने कमी केल्याने रुग्णांचे हाल 


एका बाजूला सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसह अनेक तालुक्यात कोरोना मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत असताना प्रशासनाकडून लिक्विड ऑक्सिजनचा कोटा निम्म्याने कमी झाल्याने रुग्णांची तडफड वाढू लागली आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने 2 मे रोजी ऑक्सिजन वाटपात फेरबदल करताना सोलापूर जिल्ह्याचा INOX चा कोटा 10 टनावरुन 5 टन केल्याने टेम्भूर्णी येथील ऑक्सिजन निर्मिती कारखाना 24 तास चालवूनही गाड्यांची गर्दी वाढली आहे. रुग्णालयात मात्र रुग्णांची ऑक्सिजनअभावी तडफड वाढू लागली आहे. एका बाजूला सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना येथे येणारा 10 टनाचा लिक्विड ऑक्सिजनचा साठा कसा पुरवठी पडणार होता. यातच या नव्या आदेशानंतर परिस्थिती गंभीर झाली आहे.
 
टेम्भूर्णी येथील प्रभाकर शिंदे यांच्या ऑक्सिगाईं निर्मिती केंद्रात रात्रंदिवस काम सुरु ठेवून 500 सिलेंडर तयार होतात. यासोबत त्यांना पूर्वी 5 टन लिक्विड ऑक्सिजन INOX कंपनीकडून मिळत होता. पण गेल्या दोन दिवसांपासून त्यांना रोज केवळ अडीच टन एवढाच साठा मिळू लागल्याने ऑक्सिजन कमी आणि मागणी खूप जास्त अशी परिस्थिती झाल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक सोलापूर जिल्ह्यात आणि विशेषतः पंढरपूरसह काही तालुक्यात आता कोरोनाची स्थिती गंभीर बनत चालल्याने ऑक्सिजनची मागणी खूप वाढत आहे. मात्र आता नेमकी रुग्णांची संख्या वाढू लागली असताना अन्न आणि औषध प्रशासनाकडून सोलापूरचा कोटा कमी केल्याचा आदेश आल्याने आता निम्माच ऑक्सिजन मिळू लागला आहे.


ऑक्सिजन पुरवठा अपुरा होत असल्यानं प्रभाकर शिंदे यांचा फोन एका मिनिटासाठी शांत राहत नाही. शिंदे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील 8 मोठे तालुके असून यात पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, बार्शी, करमाळा, माळशिरस, मोहोळ असे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. पण त्यांना मिळणारा कोटा कमी करीत राज्यातील वजनदार नेत्यांच्या जिल्ह्याचा कोटा मात्र वाढवल्याने सोलापूरला कोणी वाली उरला नसल्याचे चित्र आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना तर यातील काहीच माहिती नसून आजवर त्यांनी साधी कधी अडचणही विचारली नसल्याचे शिंदे सांगतात. वारंवार येणाऱ्या डॉक्टरांच्या फोनमुळे खूप मोठी हतबलता येत असून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाल्याशिवाय सोलापूरचा कमी केलेला कोटा वाढणार नाही आणि तोपर्यंत ऑक्सिजन विना रुग्णांचे तडफडून होणारे मृत्यू थांबणार नाहीत अशी उद्विग्न प्रतिक्रिया शिंदे देतात. पंढरपूर मधून दिवसात दोन वेळा ऑक्सिजन सिलिंडर नेण्याचे काम करीत असून तासंतास यासाठी आता वाट पाहत उभे राहावे लागत असल्याचे वाहतूकदार गणेश पोरे सांगतो. एकंदर सोलापूर जिल्ह्याला वजनदार नेता नसल्याने येथील गोरगरीब जनतेला ऑक्सिजन विना तडफडायची वेळ आली असून आता हॉस्पिटलमध्ये या ऑक्सिजन कमतरतेमुळे बेड आहेत पण रुग्णांना प्रवेश नाही असे चित्र दिसू लागले आहे.   


महत्त्वाच्या इतर बातम्या :


पंढरपूर पोटनिवडणूक 2021 : भाजपचे समाधान आवताडे विजयी; भगीरथ भालकेंच्या पराभवाची कारणे?