पंढरपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल (8 एप्रिल) दिवसभर सभांचा धडाका लावल्यानंतर रात्री पंढरपूरमध्ये काही राजकीय गोळाबेरीज करणाऱ्या भेटी घेतल्या. या भेटींमुळे भाजपाची हवा टाईट झाली असून अजित पवार यांनी ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे हे यावरुन दिसून आले. 


काल शेवटची सभा संपवून अजित पवार हे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना घेऊन पहिल्यांदा धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. इथे धनगर समाजाच्या अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत राष्ट्रवादीच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. हा भाजपला पसंती देणारा मतदार अशी ओळख असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी तुमच्या मागण्या पूर्ण करुन तुमच्या मागे उभे राहिल, असं सांगत त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. दत्तात्रय भरणे हे देखील धनगर समाजाचे असून त्यांना आधी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि नंतर दोनवेळा आमदारकी आणि मंत्रीपद दिल्याने धनगर समाज आपलेसे करण्याची बेरजेची खेळी पवार यांनी खेळली.
 
यानंतर मनसेचे राज्य समन्वयक आणि शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जात त्यांनी मनसैनिकांशी चर्चा केली. यावेळी मनसे तटस्थ असल्याने मनसेची ताकद आपल्या मागे वळवण्याची दुसरी खेळी अजित पवार यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जमले होते.
 
मग अजित पवार यांनी आपला मोर्चा थेट परिचारक गटाच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे वळवला. साधना भोसले यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आणि चर्चा केल्याने भाजपाला घाम फुटला. साधना भोसले या भाजपच्या चिन्हावर पंढरपूरच्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांचे पती आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी यावेळी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने ते नाराज होते. याचाच फायदा उठवत अजित पवार यांनी साधना भोसले यांची भेट घेतल्याने शहरात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. 


एकंदर अजित पवार आता आपले सर्व फंडे या निवडणुकीत बाहेर काढत असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकण्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली आहे. या नाईट डिप्लोमसीमुळे भाजपच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत.  भाजपकडून देवेंद्र फडणवीस अद्याप प्रचारात उतरले नसले तरी अजित पवार यांचा झंझावात भाजपाला नामोहरम करुन सोडत आहे. आज (9 एप्रिल) दिवसभर अशाच पद्धतीने अजित पवार मंगळवेढ्यात प्रचार आणि भेटीगाठी करणार असल्याने भाजपाची चिंता वाढली आहे.