पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढ्याचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त जागी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजता पंढरपूर येथील शासकीय गोदामात सुरु होणार आहे. कोरोनाच्या संकटामध्ये 24 ऐवजी एकूण 38 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होत असल्याने निकाल येण्यास उशीर होणार असला तरी मतमोजणीच्या कल दुपारी बारापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एकूण 19 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार असला तरी मुख्य लढत ही भाजपचे समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्यात होणार आहे. ही झलेली निवडणूक अतिशय अटीतटीची झाल्याने मतमोजणीतही काट्याची टक्कर शेवटच्या फेरीपर्यंत राहायची शक्यता आहे. 


या निवडणुकीत एकूण 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले होते. याशिवाय ८० वर्षावरील व दिव्यांग आदी 3252 मतदारांनी पोस्टाने मतदान केले आहे. याशिवाय 73 सैनिकांनी देखील पोस्टाने आपला मतदानाचा हक्क बजावला असून उद्या सकाळी आठपर्यंत सैनिकांची येणारे पोस्टाची मतदान गृहीत धरली जाणार आहेत. 


उद्या सकाळी 14 टेबलावर सकाळी आठ वाजता पहिल्या फेरीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. याचवेळी इतर 2 टेबलावर पोस्टाची मते मोजली जाणार असून 6 टेबल राखीव ठेवण्यात आली आहेत. 


गेल्या तीन निवडणुकांपासून सुरु असलेला मंगळवेढ्याच्या 35 गावाच्या पाण्याचा प्रश्न याही निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरल्याने मंगळवेढा भागात याचा प्रभाव मतमोजणीत दिसून येणार आहे. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि शिवसेनेच्या बंडखोर शैला गोडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जेवढी जास्त मते हे दोन उमेदवार घेतील तेवढा जास्त फटका राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना बसणार आहे. 


त्याच पद्धतीने भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या विरोधात त्याचाच चुलत भाऊ सिद्धेश्वर अवताडे यांच्या बंडखोरीचा फटका भाजपाला बसणार आहे. सिद्धेश्वर अवताडे मंगळवेढ्यात जेवढी जास्त मते घेईल तितका समाधान अवताडे यांना धोका वाढणार आहे. एकंदर अतिशय चुरशीची अशी होत असलेल्या मतमोजणीत पहिल्या काही फेऱ्यात जर एखाद्याने मताधिक्य घेतले तर त्याचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.