पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 57.81 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदान सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. कोरोनाच्या संकटातही लोकांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अखेरच्या टप्प्यात मतदानाचा वेग वाढला तरी कोठेच रांगा नाहीत हे विशेष आहे. त्यामुळे आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण हे लवकरच स्पष्ट होईल. 2019 निवडणुकीत 72 टक्के मतदान झाले होते. यंदा दोन तासाचा अवधी वाढवल्याने गेल्यावेळी पेक्षा जास्त म्हणजे 78 ते 80 टक्के एवढे मतदान होण्याची शक्यता आहे.


भाजप उमेदवार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यातच ही प्रमुख होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यात भाजप व राष्ट्रवादी शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील , शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार शैला गोडसे , वंचित बहुजन आघाडीचे बिराप्पा मधुकर मोटे आणि सिद्धेश्वर अवताडे हे प्रमुख काही उमेदवार आहेत. 


यातील सिद्धेश्वर अवताडे हे भाजपच्या समाधान अवताडे यांचे चुलत बंधू असून या निवडणुकीत भाऊ बंधकी भाजपाला अडचणीची ठरायची शक्यता आहे. स्वाभिमानी, वंचित आणि अपक्ष शैला गोडसे यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढलेल्या आहेत. भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मोठ्या विजयाच्या वल्गना केल्या असल्या तरी हि निवडणूक अतिशय घासून व चुरशीची असल्याने येथे काट्याची टक्कर होणार आहे. एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार या 19 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार असून आज 524 मतदान केंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान पार पडत आहे. कोरोनाबाधित मतदारांनाही त्यांचा हक्क बजावता येणार आहे. सायंकाळी 6 ते 7 यावेळेत त्यांना मतदान करता येणार आहे.