पंढरपूर : यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याचं स्वरूप कसं असेल, याचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. राज्यातील नऊ पालखी सोहळा प्रमुखांनी पायी वारीचा प्रस्ताव ठेवलाय. पण देवाच्या आळंदीतील ग्रामस्थांनी मात्र याला विरोध दर्शविला आहे. वारकरी संप्रदायाला बदनाम करायचं नसेल तर एसटीतूनच हा सोहळा पंढरपूरला नेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी राज्य सरकारकडे केली आहे.


पहिल्या लाटेत दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमधून तबलिकी समाज कोरोनाला घेऊन देशात विखुरला तर दुसऱ्या लाटेत कुंभमेळा आणि निवडणुकांमुळे देशात कोरोना फोफावला.यामुळे अनेकांचे सगेसोयरे तर गेलेच, सोबत देशातील लाखो नागरिकांचे बळी देखील गेले. अशात आषाढी पालखी सोहळा पायी नेण्याची मागणी केली जात आहे.


पायी वारीत कोरोनाने शिरकाव केला आणि त्यानंतर वारकरी आपापल्या घरी पोहचले तर याचे परिणाम  संपूर्ण महाराष्ट्राला ते भोगावे लागतील. आदर्श समाज रचना, विश्वशांती, सामाजिक सलोखा अशी संतांची शिकवण आहे. पण पायी वारीच्या चुकीच्या अट्टाहासाने कोरोना फोफावला तर संतांच्या या शिकवणीला तडा जाईल. शिवाय अखंड वारकरी संप्रदायाची अवहेलना आणि बदनामी ही होईल. हे टाळायचं असेल तर एसटीतून हा सोहळा पंढरपूरला पाठवावा, अशी मागणी आळंदी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.


वारकरी सांप्रदायांच्या भावनांचा सन्मान करून पायी वारीला परवानगी द्यावी,  अशी ही मागणी राज्य सरकारकडे केली जात आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटा पसरण्यापूर्वी घडलेल्या गोष्टी आणि त्यानंतर झालेली बदनामी हे पाहता वारकरी संप्रदायाने सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. पांडुरंगाला देखील ते मान्य होईलच.


आषाढी यात्रा हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळा मनाला जातो. शेकडो वर्षांपासून पालख्या आणि सोबत लाखोंचा जनसागर घेत हे सोहळे पंढरीच्या दिशेने पायी चालत येतात. मात्र गेल्या वर्षी कोरोना आला आणि ही पायी वारीची परंपरा महामारीमुळे बस मधून पालख्या आणून पूर्ण करण्यात आली.  गेल्या वर्षी आलेली पहिली लाट खूपच सौम्य होती मात्र यंदाची दुसरी लाट खूपच घटक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत . शेकडोंच्या प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत पालखी सोहळा पायी आणायचा वारकरी संप्रदायाचा आग्रह असून कोरोनाचे नियम पाळून मर्यादित संख्येत पायी पालखी सोहळ्याची परवानगी देण्याची मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. 



संबंधित बातम्या :


Pandharpur Ashadi Wari 2021 : 'आषाढी वारी पायी नको', पालखी मार्गावरील गावातून होऊ लागला विरोध