सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर भाजपाने माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उमेदवारी अर्ज भरणारे संग्रामसिंह देशमुख आणि जिल्हातील भाजप नेत्यामध्ये कडेपुर येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात बराच काळ चर्चा झाली. या चर्चेनंतर संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज मागे घेतल्याचं चंद्रकात पाटील यांनी जाहीर केलं.

विद्यमान आमदार किंवा खासदार दिवंगत झाल्यास तिथे उमेदवार न उभा करण्याची आपली परंपरा भाजप कायम ठेवत असल्याचं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान तर 31 मे रोजी मतमोजणी होणार होती.

रिक्त झालेल्या जागी काँगेसकडून यापूर्वीच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना विरोध म्हणून भाजपनेही जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल करुन खळबळ उडवून दिली होती. तर दुसरीकडे शिवसेनेने विश्वजित कदम यांना जाहीर पाठिंबा दिला होता. भाजपनेही उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी विनंती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली होती.

मात्र आता भाजपबरोबरच सर्व अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे विश्वजित कदम बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला.