पंढरपूर : ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपुरात दाखल होणार आहे. उद्या मंगळवारी आषाढी एकादशी असल्यानं लाखो वारकऱ्यांची मांदियाळी पंढपुरात दाखल झाली आहे. तसंच आज दोन्ही पालख्यांचं उभं रिंगण पार पडणार आहे.
काल रविवारी बाजीराव विहीर इथं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उभं आणि गोल रिंगण पार पडलं. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. रविवारी तुकाराम महाराजांची पालखी पीराची कुरोलीतून निघेल आणि वाखरी तळ येथे मुक्कामी होती. तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भंडीशेगावमधून निघून वाखरी येथे मुक्कामी होती.
पंढरीच्या दिशेनं विठुरायाच्या भेटीला राज्यासह देशभरातून वारकरी निघाले आहेत. यावेळी वारकरी भजन, कीर्तन, भारूड, गवळणी गुणगुणत पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होतात. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी वारकरी संगीतातल्या वाद्यांनी पंढरीतील बाजारपेठ सजली आहे. तसंच कुंकू, बुक्का, प्रसाद, आणि पुजेच्या साहित्यानं पंढरी सजली आहे.
पंढरीत वाद्यांची बाजारपेठ सजली
वारकऱ्यांच्या संगीताचा आणि दिंडीचा आत्मा असतो ते म्हणजे वीणा, मृदंग आणि त्याला साथ असते ती शेकडो टाळांची. यासोबतच चिपळ्या, डफ आणि खंजिरिया यांचाही वापर वारकरी संगीतात होताना दिसत आहे.
अशाच वारकरी संगीतातल्या वाद्यांची बाजारपेठ पंढरीत आहे, आणि ज्यात लाखोंची उलाढाल दरवर्षी होत असते.