मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नोटीस पाठवली आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात 4 जुलैला चर्चेसाठी हजर राहण्याची सूचना या नोटिसद्वारे करण्यात आली आहे.
स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सदाभाऊंविरोधात अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवली. त्यांचं वर्तन संघटनेच्या हिताला धोका पोहोचवणारं आहे, असा आक्षेप पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतला. त्यानंतर सदाभाऊंबाबत निर्णय घेण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती.
या चार सदस्यीय समितीने 4 जुलैपूर्वीच चर्चा करुन निर्णय घ्यावा, असा बैठकीत ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे 4 जुलैला सदाभाऊंची बाजू ऐकण्यासाठी संघटनेने हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी होणार का, या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.
स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीनंतर वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिला होता. पण सदाभाऊ खोत यांनी या बैठकीला उपस्थितीही लावली नव्हती. त्यामुळे सदाभाऊ विरुद्ध राजू शेट्टी असं चित्र पुन्हा एकदा निर्माण झालं आहे.