पालघर : राज्यात सध्या दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. पालघर मधील बोईसर येथे एका पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी एका 12 वर्षाच्या चिमुकल्यावर संशंय घेऊन त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. पण पोलीस तपासात या प्रकरणातील चैतुसिंग ठाकूर (वय 25) या खऱ्या नराधमाचं नाव समोर आलं आहे. या नराधमानं हा किळसवाणा प्रकार केल्याचं उघड झालं आहे. 


बोईसर मधील एका परिसरामध्ये 12 सप्टेंबरला ही घटना घडल्यानंतर पालघर जिल्हात खळबळ माजली होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी 14 सप्टेंबरला बोईसर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून एका बारा वर्षीय चिमुकल्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आलं होतं.
       
मात्र या प्रकरणात पोलिसांचा संशय बळावला होता. त्यामुळे कारवाई झाल्यानंतरही बोईसर पोलिसांनी आपला तपास गुप्त पद्धतीने सुरुच ठेवला. या तपासात अखेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा प्रकार त्या चिमुकल्याकडून घडला नसल्याचं समोर आलं. त्या नंतर बोईसर पोलिसांनी 25 वर्षीय नराधमला गुरुवारी बेड्या ठोकल्या.


या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर एका अल्पवयीन 12 वर्षाच्या मुलाला अटक करून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. 


इतक्या दिवसात या निरपराध व निरागस बालकाच्या मनावर काय परिणाम झाले असतील, याला जबाबदार कोण हाही प्रश्न उपस्थित होत आहे. आत्ता या प्रकरणातील खऱ्या 25 वर्षीय आरोपीला पकडल्यानंतर या बारा वर्षीय निरपराध चिमुकल्याची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आत्ता पालघर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


महत्वाच्या बातम्या :