पालघर : जिद्द असली तर माणूस काय करु शकतो, याचं उदाहरण पालघर जिल्ह्यातील कल्लाळे येथील कल्पेश विलास दौडा या विद्यार्थ्याने समोर ठेवलं आहे. जन्मतःच दोन्हीही हात नसलेल्या कल्पेशने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत 75.40 टक्के गुण घेतले आहेत.

कल्पेश हा बोईसर जवळील बेटेगाव येथे आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रम शाळेत शिक्षण घेतो. जन्मतःच त्याला खांद्यापासून दोन्हीही हात नाहीत. तरी त्याने शिक्षणाची आवड कधी सोडली नाही. कल्पेशच्या कल्लाळे या गावापासून शाळेचं अंतर तीन किमी आहे. जायला रस्ता नाही. त्यामुळे दररोज सहा किमीचा ये-जा प्रवास केला. पावसाळ्यात तर चिखल तुडवत शाळेत जावं लागायचं.



अडचणी कितीही असल्या तरी कल्पेशने जिद्द सोडली नाही. दहावीत त्याने 75.40 टक्के गुण घेतले. हात नसले म्हणून काय होतं, असं म्हणत त्याने पायाने अक्षर गिरवायला सुरुवात केली. संपूर्ण लिखाण तो पायानेच करतो. यापेक्षा विशेष म्हणजे आपली क्रिकेटची आवड जोपासत तो गोलंदाजीही पायानेच करतो.



घरात वडील कमावणारे एकटेच आहेत. दोन बहिणी आणि आई असा परिवार आहे. या परिस्थितीवर मात करत त्याने हे यश मिळवलं. कल्पेशच्या आई-वडिलांना त्याचा अभिमान आहे. कल्पेश हा आदिवासी समाजातील विद्यार्थी असून त्याचे वडील बोईसरमधील एका कारखान्यात बारा तास ड्युटी करतात. अजूनही सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. दारिद्र रेषेखाली नाव नाही, त्यामुळे कुडाचं घर आणि त्यावर छप्पर अशा परिस्थितीत कल्पेशचं कुटुंब राहतं.



कल्पेशने दहावीपर्यंतचा प्रवास कठीण मेहनत करुन पार केला असला तरी हा प्रवास अजून संपलेला नाही. शिकून मोठा अधिकारी होण्याची कल्पेशची इच्छा आहे. मात्र दोन बहिणी आणि कल्पेशच्या शिक्षणाचा खर्च दौडा कुटुंबीयांना परवडणारा नाही. त्यामुळे पोराला शिकवण्यासाठी कल्पेशच्या वडिलांना मदतीच्या हातांची गरज आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, योजना जाहीर केल्या जातात. मात्र याची गावपातळीवर अंमलबजावणी होते का हे पाहण्याची तसदी कुणीही घेत नाही. त्यामुळे कल्पेशसारख्या होतकरु विद्यार्थ्यांना सरकारच्या या शैक्षणिक योजनांची मदत मिळणं गरजेचं आहे.