मारुती घरत यांची वाडा तालुक्यातील बिलोशीमध्ये वडिलोपार्जित जमीन आहे. मात्र सर्व्हे नं . 774 , 19, 676 या जागेतून रिलायन्सची गॅस पाइपलाइन जाते. जागेचा योग्य मोबदला दिला जात नसल्यामुळे मारुती यांनी रिलायन्स कंपनीला जागा देण्यास नकार दिला.
जागा न दिल्यामुळे कंपनीने दलाल पाठवून मारुती आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली आणि विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती घरत कुटुंबीयांनी दिली आहे.
या प्रकारानंतर न्याय मागण्यासाठी गेलेल्या मारुती यांना पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करुन तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवलं. न्याय मिळत नसल्याने आपल्याला इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी घरत कुटुंबीयांनी केली आहे.
स्थानिक प्रशासनापासून जिल्हा प्रशासनापर्यंत सर्व स्तरावर पत्रव्यवहार करुनही न्याय मिळत नसल्यामुळे घरत कुटुंबीयांनी इच्छामरणासाठी अर्ज केला आहे.
या प्रकरणात तातडीने चौकशी करुन घरत कुटुंबाला योग्य न्याय दिला जाईल, असं आश्वासन पालघर जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिलं आहे. मात्र रिलायन्स गॅस पाइपलाइनचं पालघर जिल्ह्यात भूसंपादनाचं काम सुरु झाल्यापासून रिलायन्सकडून नेमण्यात आलेल्या दलालांकडून मोठ्या प्रमाणावर कायदा हातात घेतल्याची प्रकरण समोर येत आहेत.