Maharashtra News: भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना (Pakistani Intelligence Agency) देणारे डीआरडीओचे (DRDO) संचालक प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांची पॉलिग्राफ टेस्ट (Polygraph Test) करण्याची मागणी महाराष्ट्र एटीएसनं (Maharashtra ATS) केली आहे. महाराष्ट्र एटीएसनं मंगळवारी पुणे सेशन कोर्टात एक अर्ज दाखल करुन ही मागणी केली आहे. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तहेराला नक्की काय-काय सांगितलं आहे, त्यांच्याशी किती लोक संपर्कात होते,पैशांची देवाणघेवाणही झाली होती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पॉलिग्राफ टेस्टमधून मिळेल, असं एटीएसला वाटतंय. दरम्यान, प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) कडून कथितपणे हनी ट्रॅपिंग केल्यानंतर गोपनीय माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.


एटीएसच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर, डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर आणि ज्या पाकिस्तानी महिलेसोबत ही माहिती शेअर करण्यात आली होती, त्यांनी त्या महिलेसोबतच्या अनेक चॅट्स डिलीट केल्या आहेत. एटीएस एफएसएलच्या मदतीनं त्या सर्व डिलीट केलेल्या चॅट परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.  


एफएसएलकडून काही डेटा जप्त 


अत्यंत संवेदनशील माहितीची देवाणघेवाण झाल्याचं दर्शवणारा काही डेटा एफएसएलनं जप्त केला आहे. तसेच, काही गोष्टी कुरुलकर यांनी उघड केली नसल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. त्यामुळे अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्हा त्यांची पॉलिग्राफ चाचणी करायची आहे, असं महाराष्ट्र एटीएसचं म्हणणं आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास अनेक अंगानी केला जात आहे. यामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी पडताळून पाहिल्या जात आहेत. यामध्ये कुरुलकर यांना भेटण्यासाठी डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिला आल्या असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्याचाही तपास सुरू आहे. चौकशीदरम्यान कुरुलकर अनेक गोष्टींचा खुलासा करत नाहीत. तसेच, काही प्रश्नांची योग्य उत्तरंही देत नाहीत. तपास यंत्रणांना असाही संशय आहे की, कुरुलकर त्या पाकिस्तानी महिलेला परदेशात भेटायला गेले होते आणि शारीरिक संबंधांच्या लालसेपोटी कुरुलकरांनी सर्व गोष्टी महिलेला सांगितल्याचंही बोललं जात आहे. 


एटीएस कुरुलकर यांचं बँक स्टेटमेंट तपासत आहे, परंतु आतापर्यंत कोणतेही संशयास्पद व्यवहार आढळलेले नाहीत. दरम्यान, अशा प्रकरणांमध्ये, हवाला किंवा एका ठिकाणी तृतीय पक्षाचा सहभाग अशा अनेक माध्यमांद्वारे पैसे पाठवले जातात. तिथून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. त्यांच्या बँक खात्याच्या तपासादरम्यान असे कोणतेही व्यवहार समोर येत नसल्याची माहिती एटीएसनं दिली आहे.