Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये काल दहशतवादी हल्ल्याची घटना घडली (Pahalgam Terror Attack) आहे. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पहलगाममध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर देशातील जवळपास प्रत्येकच शहरातून जिल्ह्यातून मोठ्या संख्येने काश्मीरला जाण्यासंदर्भातले नियोजित टूर्स रद्द केले जात आहेत. लोकं आपल्या नियोजनात बदल करत आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या आपले टूर्स केले रद्द

नागपुरातून एकाच दिवसात काश्मीरमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या शेकडो कुटुंब किंवा ग्रुप्सने आपले येणाऱ्या दिवसातील टूर्स रद्द केले आहेत. आम्ही आपल्याच देशाच्या एका भागात सुरक्षीत नाही आहोत, ही भावना अस्वस्थ करणारी असल्याचे वानखेडे कुटुंबीयांनी सांगितले. वानखेडे कुटुंबातील 12 सदस्य एक आठवड्याच्या काश्मीर टूरला जाणार होते. पहलगामध्ये ज्या ठिकाणी घटना घडली, त्या ठिकाणी दोन दिवस थांबणार होते. मात्र कालच्या घटनेनंतर त्यांनी फक्त पहलगामच नाही, तर काश्मीरमध्ये जाण्याचा निर्णयच बदलला आहे. आम्हाला आमच्या नियोजित आनंदाला तर मुकावं लागतच आहे, मात्र एका दहशतवादी हल्ल्यामुळं काश्मीरमधील हजारो गरजू कुटुंबीयांचा पर्यटनापासून होणारे उत्पन्नही त्यांनी गमावलं आहे. हेही दुर्दैवी असल्याचे मत वानखेडे कुटुंबीयांनी व्यक्त केले. दहशतवादी हल्ल्याच्या घटनेमुळं जम्मू काश्मीरच्या पर्यटनाचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. नागपूर सह देशभरातून हजारो ग्रुप्स आणि कुटुंबीयांनी त्यांचे येणाऱ्या दिवसातील काश्मीर टूर रद्द केले आहेत. 

दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू 

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत झालेल्या 6 पर्यटकांचे मृतदेह राज्यात घेऊन येण्याची तयारी सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pahalgam Terror Attack :  नेमका कसा झाला हल्ला ते कुठून आले दहतशवादी? पहलगाम हल्ल्यानंतरचे 10 मोठे प्रश्न?