बीड : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर आज परळीच्या थर्मल पावर प्लांट मधील युनिट क्र. 8 चा ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात शिफ्ट केला आहे. ज्याचे ऑनलाईन उद्घाटन आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. या प्लांटची हवेतून तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे.


थर्मल पावर प्लांट मधील या ऑक्सिजन निर्मिती प्लांटद्वारे दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन हवेतून वेगळा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथील एसआरटी ग्रामीण रुग्णालयात चोवीस तासात साधारण 300 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन तयार होईल व यामुळे येथील ऑक्सिजनचा तुटवडा कायमचा मिटणार आहे. 


परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ साठून पाणी खराब होऊ नये यासाठी हा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात येतो. केंद्रातील युनिट क्र. 6 व 7 मधील ऑक्सिजन प्लांट पूर्ववत राहतील. युनिट क्र. 8 मधला प्लांट मात्र अंबाजोगाईला शिफ्ट करण्यात आला आहे. अंबाजोगाईमध्ये उपचार घेत असलेल्या 50 टक्केपेक्षा जास्त रुग्णांना या ऑक्सिजनचा फायदा होणार आहे.


स्मशानभूमीपर्यंत रुग्णांना पोहोचवण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची - अंबाजोगाई नगरपालिका


अंबाजोगाईमध्ये एका रुग्णवाहिकेमध्ये 22 मृतदेहांना नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नगरपालिकेने मात्र हा सगळा प्रकार रुग्णालय प्रशासनामुळे घडत असल्याचे सांगितले आहे. प्रोटोकॉलप्रमाणे स्मशानभूमीपर्यंत मृतदेह पोहोचल्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारीही निश्चितपणे नगरपालिकेची आहे. मात्र, स्मशानभूमीपर्यंत मृतदेह पोहोचवण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे. त्यामुळे त्या बाबतीत त्यांनी काळजी घ्यावी, असा खुलासा अंबाजोगाई नगरपालिकेचे सीईओ अशोक साबळे यांनी केला आहे.