औरंगाबाद : सिनेमागृहात गेल्यानंतर तुम्हाला बाहेरचे खाद्यपदार्थ प्रवेशद्वारावरच काढून ठेवावे लागतात. मात्र ग्राहकाला हवं ते अन्न सिनेमागृहात नेऊन खाण्याचा अधिकार आहे. सिनेमागृह व्यवस्थापन ग्राहकाला अडवू शकत नाही, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिली.


औरंगाबादमध्ये अरुण देशपांडे एबीपी माझाशी बोलत होते. खाद्यपदार्थ सिनेमागृहात नेताना केवळ सुरक्षेच्या दृष्टीने त्याची सर्व प्रकारची पडताळणी होणं गरजेचं आहे. मात्र खाद्यपदार्थ सिनेमागृहात नेण्यापासून मज्जाव करण्याचा व्यवस्थापनाला अधिकार नसल्याचं अरुण देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

खाद्यपदार्थ नेताना अडवणूक केल्यास काय कराल?

कायदा काहीही सांगत असला तरी सिनेमागृहात बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यापासून मज्जाव केला जातोच. त्यामुळे अशा वेळी काय करायचं, हे एक जबाबदार ग्राहक म्हणून प्रत्येक व्यक्तीला माहित असणं गरजेचं आहे. तुम्हालाही अशा प्रसंगाचा सामना करावा लागल्यास तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे (डीएसओ) याबाबत रितसर तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर ग्राहकाला पुढील माहिती दिली जाईल.

दरम्यान यापुढे राज्यातील सर्व सिनेमागृहांबाहेर याबाबतची नियमावली लावली जाणार असल्याचं अरुण देशपांडे यांनी सांगितलं. याबाबतची नोटीस सर्व सिनेमागृह मालकांना दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे सिनेमागृहातील पदार्थ विकण्यासाठी ग्राहकांची होणारी ही लूट आता तरी थांबेल, अशी अपेक्षा आहे.

''छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास तक्रार करा''

कोणत्याही वस्तूचे छापील किंमतीपेक्षा म्हणजे एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेतले जाऊ शकत नाहीत. मात्र पाणी बॉटलसारख्या वस्तूंची सिनेमागृहात वाढीव दराने विक्री केली जाते. त्याबाबतही तक्रार केली जाऊ शकते. प्रत्येक जिल्ह्यातील वैधमापनशास्त्र विभागाच्या कार्यालायात ही तक्रार करता येते. ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावं, असं आवाहनही अरुण देशपांडे यांनी केलं.