भवानी रोड, महाद्वार रोड आणि कामे गल्लीत असलेल्या काही दुकानांमधून भाविकांची फसवणूक सुरु असल्याचं उजेडात आलं आहे. देवीला अर्पण करण्यासाठी वापरलं जाणार 8 रुपयांच्या चिरडी वस्त्राला अडीच ते तीन हजार रुपयाचं महावस्त्र बनवून भाविकांच्या माथी मारलं जात आहे.
फसवणुकीचा हा प्रकार तुळजापुरातील सजग नागरिक विजय भोसले यांनी एबीपी माझाच्या निदर्शनास आणून दिला. एका साडीचे दोन ते तीन तुकडे करुन त्याचं तथाकथित महावस्त्र बनवून ते भाविकांच्या माथी मारलं जात आहे. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेची अशा प्रकारची विटंबना कशी थांबणार, हा प्रश्न आता विचारला जात आहे.
विजय भोसलेंनी हे लक्षात आणून दिलं की एका साडीचे दीड ते दोन फुटाचे तुकडे तयार केले जातात. या तुकड्यांना दुकानदारांच्या भाषेत चिरडी असं म्हणतात. या तुकड्यांच्या आत हिरवा कागद आणि रद्दी भरली जाते. त्यामुळे चिर्डीचा आकार बदलून ते साडी सारखा होतो. हेच वस्त्र महावस्त्र म्हणून तीन हजार रुपयांपर्यंत भाविकांच्या माथी मारला जाते. भाविक ते वस्त्र घेऊन मंदिरात पूजेला जातात.
भाविकांच्या भावनेशी खेळ करुन अर्धवस्त्र चढवणे खरं म्हणजे श्रद्धेची विटंबना आहे. परंतु नाइलाजाने पुजाऱ्यांना हे वस्त्र अर्पण करावं लागतं. त्यातून पुजारी आणि भाविक असे काही वादाचे प्रसंगही होत आहेत.
यासंदर्भात विजय भोसलेंनी राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या मंदिर प्रशासनाला 14 मार्चला निवेदन दिलं. त्यावर मंदिर प्रशासनाने हा आपला विषय नसल्याचे सांगत हात वर केले.
तुळजापुरात भाविक दाखल होताच सर्व धर्मस्थळात जसा भाविकांना दुकानदारांचा गराडा पडतो, तसंच इथंही होतं. आता भाविकांच्या लक्षात ही फसवणूक येऊ लागली आहे. परंतु त्यांना हे माहीत नाही की दाद कुणाकडे मागायची.