उस्मानाबाद : उस्मानाबादमधील वैतागलेल्या शेतकऱ्यांनी ऊस पेटवून देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी शेतकऱ्यांने जिल्हाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्याचं ठरवलं आहे. साखर कारखानदार आणि ऊसटोळीच्या वाढत चाललेल्या अन्यायामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

Continues below advertisement


उस्मानाबादमधील 60 शेतकऱ्यांनी शेतातील ऊस पेटवून देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस पेटविण्याचा कार्यक्रमास उपस्थित रहावे, असं निमंत्रण त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर सांभाळलेला ऊस पेटवून देण्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढावली आहे.


कारखानदारांनी तर शेतकऱ्यांवर अन्याय केलाच आहे, पण दुसऱ्या बाजूला ऊसतोड टोळीचालकांच्या मुजोर कारभाराला कोणाचाही लगाम नसल्याचं वास्तव आहे. एकीकडे ऊस वाळून जात आहे, तर कारखानदार ऊस घेऊन जात नसल्याचे चित्र आहे. ऊस न्यायचा झाला तर टोळीचालकांकडून वाटेत त्या किंमतीची मागणी केली जात आहे. एकरी सहा हजार रुपये त्यानंतर प्रत्येक खेपेला पाचशे रुपये अशा प्रकारच्या मागण्या होताना दिसत आहे.


शेतकऱ्यांनी कर्ज काढून ऊसाचं पीक जगवलं आहे. एकीकडे पावसाचं प्रमाण कमी असल्याची ऊसाची योग्य वाढ झाली नाही. आता कारखानदार वेळेत ऊस घेऊन जात नसल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पेटवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.