उस्मानाबाद/सातारा : वळवाच्या पावसानं शनिवारी मराठवाड्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. वीज पडून मराठवाड्यात 7 जणांचा बळी गेला आहे तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे 10 जनावरंही दगावली आहेत.

 
दरम्यान वादळी पावसामुळे घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पोहनेर, केकस्कळवाडीतल्या तब्बल 42 घरांवरचे पत्रे उडून गेलेत, तर 50 हून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे गावातील विद्युत डेपो जमीनदोस्त झाले असून अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले होते. त्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला.

 
ग्रामस्थांनी या वळवाच्या पावसापासून वाचण्यासाठी पलंग, टेबल आणि चौकटीचा आधार घेतला. याशिवाय जालना आणि नांदेडलाही पावसानं झोडपलं.

 

दुसरीकडे सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. सातारा लगतच्या परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. साताऱ्यातील मान खटाव या दुष्काळी भागातसुद्धा पावसाने हजेरी लावली.

 

सुसाट वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे सातारा परिसरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. या पावसामुळे अनेक झाडे पडली. मात्र वाऱ्यासह पडत असलेल्या पावसाने साताऱ्याच्या वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.