मुंबई : देशभरात आज संविधान दिन (Constitution Day) साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. पुण्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय संविधानाची माहिती देऊन संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याबरोबरच 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यासह राज्यभरात समता पर्व साजरे करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित 'संविधान सन्मान दौड' मध्ये चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर संविधनातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या दौडमध्ये पॅराप्लेगिक सेंटरचे वीस जवानांसह आर्मीचे साठ जवान सहभागी झाले होते.
बारामतीत रॅली
बारामती शहरात संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बारामती शहरातील मुख्य चौकातून रथ यात्रा काढण्यात आली. समता सैनिक दलाच्या अनेक कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभाग घेतला.
डोंबिवलीत संविधान प्रबोधन सभेचे आयोजन
संविधान दिनानिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डोंबिवलीत आज संविधान प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस प्रमुख वक्ते म्हणून साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित होते. यावेळी श्रीपाल सबनीस यांनी संविधानाचे महत्त्व उपस्थिताना सांगितलं.
"सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजेच लोकशाही असून सत्ता केंद्रित करणे योग्य नाही. केंद्राच्या सत्ता केंद्रित करण्याच्या प्रयत्नामुळे राज्य आणि केंद्राचे संबंध बिघडले असून लोकशाहीच्या संपूर्ण रचनेला धोका निर्माण झाला आहे. लोकशाही ज्या चार स्तंभावर उभी आहे ते स्तंभच डळमळीत झाले आहेत. हे चित्र लोकशाहीसाठी मारक असून लोकशाहीची तिरडी निघतेय की तिची गौरव यात्रा निघतेय असा प्रश्न पडल्याचे यावेळी श्रीपाल सबनीस म्हणाले.
अकोल्यात 'वॉक फॉर संविधान'
अकोल्यात संविधान दिनानिमित्त 'वॉक फॉर संविधान' आयोजन करण्यात आलं होतं. 'नेहरू युवा केंद्र', 'संविधान प्रचारक लोकचळवळ' आणि 'इंडियन स्पीकर फोरम' यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं होतं. रेल्वे स्टेशन चौक ते अशोक वाटिका या मार्गावरून ही ' वॉक फॉर संविधान' रॅली काढण्यात आली. शहरातील नागरिक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या