मुंबई : सध्या मुंबईतल्या महापालिकेच्या सत्ताकारणामुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या अस्वस्थेतेचा फायदा विरोधक उठवण्याची दाट शक्यता आहे. कारण आगामी विधिमंडळ अधिवेशनात विरोधक सरकारविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून असा अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. विरोधकांनी ही खेळी खेळल्यास भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.
शिवसेनेच्या भूमिकेवर राज्यातील फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अविश्वास ठराव आणल्यास शिवसेनेच्या भूमिकेला अत्यंत महत्त्व प्राप्त होणार आहे.
काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नसीम खान काय म्हणाले?
येत्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विद्यमान सरकारविरोधात अविश्वास ठराव नेमका कधी आणायचा, याचा निर्णय येत्या काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नसीम खान यांनी दिली. सर्वच आघाड्यांवर सरकारचं अपयश स्पष्टपणे दिसून येत असल्यानं असा निर्णय घेतला जाईल, असे खान यांनी म्हटले आहे. मुंबई महापौर निवडणुकीत मुंबईकरांचं हित आणि काँग्रेसची वैचारिक भूमिका या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असंही खान यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक काय म्हणाले?
शिवसेना-भाजपचं सरकार बहुमतातील आहे. हे दोन्ही पक्ष सध्या सोबत आहेत. अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणण्याचा प्रश्नच नाही. किंबहुना, अशा प्रस्तावाबाबत कोणतीही चर्चा नाही, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
विधानसभेचं सध्याचं बलाबल कसं आहे?
भाजप - 122
शिवसेना - 63
काँग्रेस - 42
राष्ट्रवादी काँग्रेस - 41
बहुजन विकास आघाडी - 3
शेकाप - 3
एमआयएम - 2
मनसे - 1
रासप - 1
सीपीआय (एम) - 1
भारीप बहुजन महासंघ - 1
समाजवादी पक्ष - 1