कोल्हापूर : कोल्हापुरात मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून पुढील पंधरा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील कोणालाही प्रवेश मिळणार नाही. परंतु या कडक लॉकडाऊनला काही तरुणांनी सुरुवातीलाच सुरुंग लावला. रंकाळा तलावाजवळच्या जावळा गणपती चौकात तीन तरुण पहाटे तीन वाजता मोठ्या आवाजात गाणी लावून आणि नाचत होते. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि लाठ्यांनी चांगलाच प्रसाद दिला.


अभिनेता स्वप्नील राजशेखर यांच्या घराखाली हा प्रकार घडला. त्यांनीच हा व्हिडीओ शूट करुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण गाणी लावून नाचत होते. तर एक जण त्यांचा व्हिडीओ बनवत होता. यानंतर पोलीस तिथे आले. तेवढ्यात एका तरुणाने बाईकवरुन पळ काढला. तर दोघे गाडीत लपले. त्यातला एक जण पोलिसांच्या तावडीत सापडला तर गाडीतील दुसऱ्याने संधी साधून तिथून पळ काढला. मग पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या एकाला पोलिसांनी चांगलाच चोप दिला आणि इतर दोघांना बोलावण्यास सांगितलं.

Kolhapur Lockdown | पुढील 15 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात ‘नो एन्ट्री’

कोल्हापुरात सात दिवसांचा लॉकडाऊन
कोल्हापुरात आजपासून (20 जुलै) सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही घोषणा केली. त्यानंतर पुढील पंधरा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील कोणालाही प्रवेश मिळणार नाही, असा आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी काढला. जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी देण्यात येणारे ई-पासही बंद केले आहेत. जिल्ह्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आलं आहे.

लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध आणि दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत. या लॉकडाऊनमध्ये सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. परंतु या तीन तरुणांनी लॉकडाऊनला सुरुवात होताच चौकात येऊन मोठ्या आवाजात गाणी लावून नाच करु लागल्याने पोलिसांनी चांगला चोप दिला. त्यामुळे पुढील सात दिवस लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना काय शिक्षा मिळेल याची झलक पोलिसांनी दाखवली.

कोल्हापुरात कोरोनाचे वाढते रुग्ण
कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पण जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

Kolhapur Lockdown | भर चौकात नाचणाऱ्यांना पोलिसांचा चोप;अभिनेता स्वप्नील राजशेखरच्या घराखालचा प्रकार