जालना : महापुरात होडीत बसून सेल्फी काढणाऱ्या गिरीश महाजनला जोड्यानं हाणलं पाहीजे, अशी जहरी टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. भोकरदन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलताना धनंजय मुंडे यांनी ही टीका केली आहे.


राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा औरंगाबादच्या पैठणमधून पुन्हा सुरु करण्यात आली. यावेळी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये बोलताना धनंजय मुंडे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली आहे. "महापुराच्या वेळी सेल्फी काढणाऱ्या गिरीश महाजनला जोड्यानं हाणल पाहिजे", अशी टीका त्यांनी केली आहे. महाजन यांच्यासोबतच सदाभाऊ खोत यांच्यावरही मुंडेंनी निशाणा साधला आहे. महापुरावेळी सदाभाऊ खोत यांच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ वरुन महाजन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मड्यावरील लोणी खाणारी ही लोकं असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेले असताना गिरीश महाजन यांचा सेल्फी व्हिडीओला हसून दाद देतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर हजारो-लाखो लोक पुरात अडकले असताना मंत्री आनंदात आहेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. गिरीश महाजन यांच्या त्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

'पूर' पर्यटन गिरीश महाजनांच्या अंगाशी, महाजनांसमोरच स्थानिकांचा संताप