पंढरपूर : धर्मशास्त्राने विविध पापांचे क्षालन करण्यासाठी अनेक उपाय दिले आहेत. मात्र ज्याला हे उपाय जमत नाहीत, अशा सर्व भाविक भक्तांना ही फाल्गुन कृष्ण अर्थात पापमोचनी एकादशी केल्यास त्यांच्या पापाचे क्षालन होईल, असे महत्व असणारा आजचा दिवस आहे. मराठी महिन्यात येणारी ही शेवटची एकादशी असून वर्षभर घडलेल्या कायिक, वाचिक आणि मानसिक पापांपासून प्रायश्चित्त करायचा आजचा दिवस वारकरी संप्रदायात मनाला जातो. सध्या कोरोनामुळे पुन्हा विठुरायाचे मंदिर बंद असल्याने भाविकांनी आपल्या घरातूनच उपासना करून विठुरायाचे मानसिक दर्शन घेत हा दिवस विठूनामाने व्यतीत करावा, अशी संप्रदायाची अपेक्षा आहे. 




धर्म शास्त्राने मानव कल्याणासाठी विधी आणि निषेध असे दोन कर्माचे प्रकार सांगितले आहेत. जे केले पाहिजे त्यास विधी म्हणाले आहे, तर जे करायचे नाही त्याला निषेध मानले आहे. याच शास्त्रात कर्माचेही प्रकार असून यात नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित कर्म हे चार प्रमुख प्रकार दिले आहेत. यात रोज करतो ते नित्य कर्म, विशिष्ठ कार्यासाठी केले जाणारे नैमित्तिक कर्म, इच्छापूर्तीसाठी केले जाणारे काम्य कर्म आणि प्रायश्चित्तासाठी केले जाणारे प्रायश्चित कर्म आहे. यात रोजच्या जीवनात घडणारे कायिक, वाचिक आणि मानसिक या तीन प्रकारच्या पापांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी केलेले उपाय आजच्या दिवशी म्हणजे पापमोचनी एकादशीला केल्यावर त्यांच्या पापांचा नाश होतो, असे वारकरी संप्रदायात मानले जाते. 
      
यासाठी पुराणात एक कथाही सांगितली जाते. ती कथा म्हणजे, कुबेराच्या चैत्रबन या अनुपम वनात चवन ऋषींचे पुत्र मेधावी हे तपश्चर्या करीत होते. त्यावेळी त्यांचा तपोभंग करण्यासाठी मंजुघोषा नावाची अप्सरा आली आणि तिने कामदेवाच्या मदतीने ऋषी मेधावी यांचा तपोभंग केला. यावर क्रोधीत झालेल्या मेधावी ऋषींनी मंजुघोषा या अप्सरेला पिशाच होण्याचा शाप दिला. यावर घाबरलेल्या मंजुघोषाने ऋषी मेधावी यांची क्षमा याचना केल्यावर मंजुघोषाला पापमोचनी एकादशीची उपासना करण्याचा उपदेश देत तिला उशाप दिला. यानंतर मंजुघोषा हिने पापमोचनी एकादशीची उपासना केल्यावर ती शापमुक्त झाली. हीच उपासना करण्याचा सल्ला ऋषी चवन यांनी आपला मुलगा ऋषी मेधावी यांना दिला आणि ऋषी मेधावी यांनी पापमोचनी एकादशी केल्याने तेही पापमुक्त झाल्याची मान्यता आहे. वारकरी संप्रदाय ताशा वर्षात येणाऱ्या सर्व शुद्ध आणि वद्य एकादशीला विठुरायाची उपासना करीतच असतात. मात्र जे अशी उपासना करीत नाहीत त्यांनी त्यांच्या पापक्षालनासाठी आजची पापमोचनी एकादशी करावी, हीच वारकरी संतांची अपेक्षा असते. जेणेकरून भाविकांच्या हातून विठूरायाची उपासना घडावी.