आमदार यशोमती ठाकूर यांच्या मागणीला विरोधी पक्षातील आमदारांनी पाठिंबा दिला आहे. एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी असे प्रकार राज्यात वाढत असून मुंब्रा परिसरात एका मुस्लिम वाहनचालकाला जय श्री राम बोलण्याची सक्ती करुन मारहाण करण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित केला. तर काँग्रेस आमदार नसीम खान यांनीही मॉब लिंचिंग विरोधी कायद्यासोबत 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतूद करण्याची मागणी केली आहे.
विरोधकांच्या या मागणीला सत्ताधारी आमदारांपैकी राज पुरोहित, मनीषा चौधरी आणि प्रयाग आळवणी यांनी विरोध केला आहे. यावेळेस दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक सभागृहाच्या वेलमध्ये आमने-सामने आले होते.
दरम्यान उत्तर प्रदेशच्या भाजप अध्यक्षा सुनिता सिंग यांनी मुस्लिम समाजातील महिलांवर सामूहिक बलात्कार केला पाहिजे असं खळबळजनक वक्तव्य केलं असल्याचा मुद्दाही काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत मांडला. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्याबाबत कारवाई करण्यासंदर्भात नुसतं ट्विट केलं आहे. महिला आयोगाने फक्त ट्विट करु नये तर कारवाई करण्याचं धाडस दाखवावं असं आवाहनही यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.