उस्मानाबाद : नोटाबंदीनंतर आलेल्या दोन हजारच्या नोटा आता एटीएममधून हद्दपार झाल्याचं चित्र आहे. काळे पैसेवाल्यांनी अधिक मूल्याच्या या नोटांचा वापर केल्याचा संशय बँक अधिकाऱ्यांना आहे. वितरीत झालेल्या नोटापैकी ५ टक्के नोटाही परत येत नसल्याचं बँक अधिकाऱ्यांचं मत आहे.


८ नोंव्हेंबरला मोदी सरकारने काळ्या पैश्याला आळा घालण्यासाठी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करुन २ हजाराची नवी नोट बाजारात आणली. सुरुवातीची दोन महिने बँका, एटीएम आणि व्यवहारात दोन हजाराच्या गुलाबी नोटाच फिरत राहिल्या. दोन हजाराच्या नोटामुळे सुरुवातीला तर चिल्लरचे वांदे झाले होते. अनेक वादाचे प्रसंगही त्यामुळे पाहायला मिळाले. हळूहळू चलन पुरवठा सुरळीत झाल्यानंतर मात्र दोन हजाराच्या नोटाच एटीएम मधून मिळणं बंद झाले आहे. एटीएममध्ये सध्या पाचशे आणि शंभराच्या नोटाच फिरत आहेत.

औरंगाबाद, परभणी, लातूर, उस्मानाबाद शहरात एटीएम मधून दोन हजाराच्या नोटांचं प्रमाण कमी झाले आहे. काळे पैसेवाल्यांनी दोन हजाराच्या नोटा चलनातून काढून घरी जमा केल्याची शंका बँक अधिकाऱ्यांना आहे. बँकांनी वितरीत केलल्या दोन हजाराच्या नोटांपैकी फक्त ५ टक्के नोटाचं परत चलनात आल्यानं नोटाबंदीनंतर दोन हजारच्या नोटांमुळे काळे पैसेवाल्यांचेच फावेल हा अंदाज खरा ठरला की काय? अशी शंका येऊ लागली आहे.

हजार आणि पाचशेच्या साडेपंधरा लाख कोटीच्या नोटा मोदी सरकारने बाद केल्या.  त्यानंतर सरकारनं साडे नऊ लाख कोटी रुपये चलनात आणले. अद्यापही सहा लाख कोटींच्या चलनी नोटांचा तुटवडा आहे. नोटाबंदीच्या काळात बँकामध्ये रोकड भरण्यासाठी रांगा लागत होत्या. आताही एटीएमसमोर रांगा आहेत. पण आता रोकड काढण्यासाठीच रांगा दिसत आहेत.