नागपूर: नागपूरमधील पोहेप्रकरणी 1 पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. तर तीन पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, पीडित मुलाच्या तक्रारीवर अजूनही खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.


 

फुकट पोहे खाऊन ठेलेवाल्याकडूनच 9 हजार रुपये वसूल करणाऱ्या पोलिसाचा पर्दाफाश ‘एबीपी माझा’ने केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीनंतर सुनील मस्के या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. तसंच अजय थूल, गजानन निशिथकर, अंकुश घाटी या तिघांची सीताबर्डी पोलीस ठाण्यातून नागपूर पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 15 दिवसांपूर्वी तुली इंटरनॅशनल परिसरात कार्यक्रम होता. त्यासाठी पोलीस रामदास पेठ परिसरात बंदोबस्ताला होते. बराच उशीर झाल्यानं त्यांना भूक लागली आणि त्यांनी ठेला गाठला. एका मुलाच्या ठेल्यावर पोहे आणि चहाचा नाश्ता केल्यावर बिल झालं 105 रुपये. ते या मुलानं वसूलही केलं, पण त्याची शिक्षा त्याला रविवारी मिळाली.

 

रविवारी मुलाला पोलिसांनी पकडून नेलं. हे ऐकताच त्याचे काका घाबरले. त्यांनी पोलीस ठाणं गाठलं, तर फुकट्या पोलिसांचा पारा चढलेला. फक्त पोह्याचे 105 रुपये घेतले, म्हणून सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून 9 हजार रुपये वसूल केले.

 

या मुलाची परिस्थिती गरीबीची आहे. घरात खाणारी तोंडं जास्त. त्यामुळे दिवसभर पोह्याचा ठेला चालवायचा, आणि रात्रशाळेत शिकायचं, असा त्याचा दिनक्रम. एवढे कष्ट करुन त्याच्या नशीबी आली ती पोलिसांची मुजोरी.

 
पोलिसांनी अडल्या-नडलेल्यांना मदत करणं अपेक्षित आहे, इथं पोलीस फुकटेगिरीत, हप्तेखोरीत आणि खंडणीखोरीत दंग आहेत. त्यामुळे पुन्हा अशी घटना होऊ नये, असं वाटत असेल तर सीताबर्डी पोलिसांवर खंडणीखोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

 

संबंधित बातम्या:

माझा इम्पॅक्ट : फुकटात पोहे खाणाऱ्या पोलिसाची चौकशी