सांगली : सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील दोन सख्खे आणि एक चुलत भाऊ साखळी बंधाऱ्यातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. या तिघांचा शोध अद्यापही सुरु आहे. आटपाडी तालुक्यातील घाणंद इथे रविवारी (6 जून) संध्याकाळी ही घटना घडली. बराच शोध घेतल्यानंतर घाणंद तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्यालगत दोन मुलांचे कपडे आणि चप्पल सापडली आहे. रात्री उशिरा घटनास्थळी पाणबुडी दाखल झाल्या असून आज सकाळपासून मुलांचं शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे.


टेंभू योजनेचं पाणी घाणंद तलावात आलं आहे. तलाव भरुन सांडव्यावरुन पाणी वाहत होते. सांडव्यातून बाहेर पडलेले पाणी कालव्यातून आटपाडीकडे येतं. तिथे लगतच अंकुश व्हनमाने आणि लहू व्हनमाने या दोन सख्ख्या भावांची शेत जमीन आहे. लगतच्या कालव्यातून पाणी वाहत जाते. नेहमीप्रमाणे (6 जून) दुपारी तीन वाजता घरातील कुत्रे सोबत घेऊन विजय अंकुश व्हनमाने, आनंदा अंकुश व्हनमाने हे सख्खे भाऊ आणि त्यांचा चुलत भाऊ वैभव लहू व्हनमाने मासेमारीसाठी गेले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरु केली. रात्री आठ वाजता घाणंद तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्या लगत विजय आणि आनंदा यांची कापडे आणि चप्पल सापडल्या. तसंच त्यांच्यासोबत नेलेल्या कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला. तर वैभव याची काहीच माहिती लागली नाही.


ही माहिती गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस आणि महसूल प्रशासनाला कळवली. तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे रात्री साडेआठ वाजता घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोधाशोध केली मात्र पाण्याचा प्रवाह जादा असल्याने मुलांचा तपास लागला नाही. आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.