यवतमाळ : मागील 39 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्याच्या जंगलात T1 वाघीण  पकडण्यासाठी जी मोहिम सुरु होती, तिला मोठा धक्का बसला आहे. कारण T1 वाघीण आणि तिचे दोन बछडे बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी जे पॉवर पॅरा मोटर आणि दोन इटालियन श्वान आणले होते, ते आता मोहिमेतून परत गेले आहेत.


T 1 वाघिणीची राळेगाव मोहादा भागातील साधारण 18 गावात दहशत आहे. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने धुमाकूळ घातला आणि तो प्रयत्न अयशस्वी ठरला. पॉवर पॅरा मोटर खड्ड्यात गेले, त्यामुळे ते आता नादुरुस्त झाले आहे. विशेष म्हणजे भारताचे प्रसिद्ध गोल्फर ज्योती रंधावा हे सुद्धा त्यांचे प्रत्येकी 6 लाख किमतीचे केन कोर्स जातीचे दोन इटालियन श्वान घेऊन या भागात वाघीण जेरबंद करण्याच्या दृष्टीने दाखल झाले होते. मात्र तेही आता परत गेले असल्याने या मोहिमेला धक्का बसला आहे.

वन विभागाला केवळ वाघिणीचे पायांचे ठसे मिळविणे, पायदळ गस्त घालणे आणि कॅमेरे ट्रॅपवरच विसंबून रहावे लागत आहे. ज्या पद्धतीचे येथील हे सध्या दाट जंगल आहे, तेथील परिस्थिती वेगळी आहे. ज्या उंचीवरून ते पेरा मोटर उडते त्याच्या आधारे उंचावरून दाट जंगलात वाघिणीचा माग लागणे कठीण आहे.

पाहिजे तशी कुठलीच मदत त्या पॅरा मोटरद्वारे होत नसल्याने ते मोहिमेतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध गोल्फर ज्योती रंधावा या मोहिमेत दोन इटालियन शिकारी कुत्रे घेऊन दाखल झाले होते. मात्र त्यांच्यावर येथील नैसर्गिक बहुमोल ठेवा नष्ट करण्याचा वन प्रेमी आरोप करत आहेत आणि ज्या दृष्टीने ही मोहिम राबवली जातेय त्यावर त्यांचे अनेक फॉलोअर्स मित्र मंडळींकडून टीका सुरू झाली. त्यामुळे ज्योती रंधावा या मोहिमेतून परत गेले, असं वन विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलंय.

पॅरा मोटर दुरुस्तीला गेले असून काही दिवसात एका ठराविक क्षेत्रात वाघ आहे असे लक्षात आल्यावर वन विभाग पुन्हा श्वान बोलवणार आहे. अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक एस बी लिमये यांनी याबाबत माहिती दिली.

वन विभाग वाघीण आणि तिचे दोन बछडे पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण या मोहिमेला अद्याप तरी यश आलेलं नाही.

संबंधित बातम्या :
वाघिणीच्या पावलांचे ठसे शोधत गेले आणि तरसाची पिल्लं सापडली

यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीच्या शोधपथकात 'नवाब' परतले!

यवतमाळमध्ये वाघिणीला पकडण्यासाठी आणलेल्या हत्तींची घरवापसी