नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सिरसी गावात जादुटोण्याच्या संशयातून एकाची हत्या करण्यात आली आहे. श्रीकृष्ण घरत असं हत्या झालेल्याचं नाव आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
नागपूरमधील बेला पोलीस स्टेशन अंतर्गत सिरसी गावात ही घटना घडली आहे. श्रीकृष्ण घरत याचं 23 फेब्रुवारी रोजी गावातील काही लोकांशी वाद झाले होते. यावेळी गावातील काही लोकांनी श्रीकृष्ण जादूटोणा करत असल्याचे आरोपही केले होते. त्यादिवसापासून श्रीकृष्ण बेपत्ता होता.
गावात वाद झाल्यापासून श्रीकृष्ण गायब असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली होती. आज श्रीकृष्णचा मृतदेह गावाबाहेर असलेल्या खडखडा धरणाजवळ आढळला. पोलिसांनी याप्रकरणी सुभाष राणे आणि गजानन राणे या दोघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे.