24 April In History : भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी लिटल मास्टर सचिन तेंडुलकरचा जन्म झाला होता. सचिनने आपल्या खेळातून जगाच्या क्रिकेट इतिहासावर मोठी छाप उमटवली आहे. तसेच आजच्या दिवशी मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले होते.


1942 : नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन


दीनानाथ गणेश मंगेशकर (Deenanath Mangeshkar)  हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले. दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, पण देवस्थानाच्या संरक्षणासाठी त्यांनी अभिषेकी हे आडनाव घेतले. दीनानाथांच्या सुरूवातीच्या ‘किंकिणी’ आणि पुढे ‘कालिंदी’ (पुण्यप्रभाव) ‘लतिका’ (भावबंधन) ‘पद्मावती’ (उग्रमंगल) ‘तेजस्विनी’ (रणदुंदुभी) वेगळ्या घाटणीचा ‘धैर्यधर’ (मानापमान) ‘सुलोचना’ (संन्यस्त खड्ग) ‘गोतम’ (ब्रह्मकुमारी) ‘शिंवागी’ (राजसंन्यास) इ. स्त्री-पुरूष भूमिका आणि त्यांची वेगळ्या शैलीची तडफदार गाणी नाट्यरसिकांना वेड लावून गेली. 


दीनानाथ मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी २४ एप्रिल १९४३ या दिवशी होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान स्थापन केले आहे. या प्रतिष्ठानातर्फे इ.स. १९८८ सालापासून दरवर्षी २४ एप्रिल या दिवशी, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, रंगभूमी आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींस दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देण्यात येतो.


1973 : सचिन तेंडुलकरचा जन्म


क्रिकेटचा देव म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला. सचिन हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला आणि सर्वात तरुण खेळाडू आहे. 2008 मध्ये सचिनला पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.


सन 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सचिनने फलंदाजीतही अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. यासोबतच कसोटी क्रिकेटमध्ये 14 हजारहून अधिक धावा करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने वयाच्या 14 व्या वर्षी मुंबईसाठी पहिला प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला. 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कराची येथे त्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाची सुरुवात झाली.


2001 मध्ये, सचिन तेंडुलकर त्याच्या 259 डावांमध्ये 10,000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज बनला.[8] नंतर त्याच्या कारकिर्दीत, सचिन 2011 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता, त्याने भारतासाठी सहा विश्वचषक सामने खेळले. सचिन तेंडुलकर हा राज्यसभेचे माजी खासदारही राहिला आहेत. 2012 मध्ये त्याची राज्यसभेचा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


1990 : अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली


नासा आणि युरोपीयन अवकाश संस्‍था यांनी संयुक्‍तरीत्‍या तयार केलेली हबल दुर्बीण 24 एप्रिल 1990 रोजी अवकाशात सोडण्‍यात आली. अवकाशात सोडण्‍यात आलेली ही सर्वात मोठी दुर्बीण आहे.


1993 : 73 वी घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण


73 व्या घटना दुरुस्ती कायदयाने पंचायती राज या शिर्षकाखाली भाग 9-अ हा नवा भाग राज्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये कलम 243 ते कलम 243-ओ अशी कलमे समाविष्ट केलेली आहेत. याशिवाय या कायद्याने राज्यघटनेला 11 वे परिशिष्ट जोडले असून त्यामध्ये पंचायत राज संस्थाच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या विषयांची माहिती दिली आहे. 1992 मध्ये 73वी घटनादुरुस्ती संमत झाली आणि तिच्या प्रत्यक्ष कार्यवाहीस 24 एप्रिल 1993 पासून सुरुवात झाली.


73 व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज्यांची स्थापना करण्याचे बंधन प्रत्येक राज्यावर घातले आहे. त्यामुळे पंचायत राज्याची स्थापना ही आता राज्याची  घटनात्मक जबाबदारी ठरली आहे. राज्य घटनेच्या 243-बी या कलमान्वये राज्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये पंचायत राजची स्थापना करता येईल. मात्र ज्या राज्यांची लोकसंख्या वीस लाखांपेक्षा कमी असेल अशा राज्यात मध्यस्तरावरील पंचायतीची स्थापना केली नाही तरी चालेल, अशी सवलत देण्यात आली आहे. पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणे हा ७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाचा मुख्य उद्देश होता. या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक संरक्षण मिळाले आहे. याचाच अर्थ असा की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याप्रमाणे पंचायत राज्यालाही राज्यघटनेची मान्यता मिळाली आहे.


1994 : पद्मभूषण उद्योगपती शंतनूराव किर्लोस्कर यांचे निधन


शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर हे मराठी उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे त्यांचे वडील होते. व्यापार आणि उद्योग क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची दखल घेत भारतीय शासनाने इ.स. 1965 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले. तसेच त्यांना फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला.