24th April Headlines: मुंबई सत्र न्यायालयात दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर सुनावणी तसेच जेईई परीक्षेनंतरही अभियांत्रिकी प्रवेशासाठी परसेंटाईल सक्तीचं केल्याच्या मुद्दावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.


संभाजीनगरमध्ये आज भारत राष्ट्र समिती पक्षाची जाहीर सभा


छत्रपती संभाजीनगर मध्ये आज BRS पक्षाची जाहीर सभा होणार आहे. यावेळी अनेक माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडे सभेची जबाबदारी आहे. सभेला पोलिसांनी काही अटींसह परवानगी  दिली आहे. संध्याकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे. 


रत्नागिरी रिफायनरीसाठी आजपासून सर्वेक्षण 


रखडलेल्या रत्नागिरी रिफायनरीचे सर्वेक्षण आजपासून सुरू होणार आहे. सध्या विरोधी नेत्यांची पोलिसांकडून धरपकड होत आहे. काही नेते सध्या अंडरग्राउंड आहेत. त्यामुळे सध्याची संपूर्ण परिस्थिती पाहता होणारा विरोध हा मोठा असेल. मुख्य बाब म्हणजे रिफायनरी सर्वेक्षणासाठी 22 एप्रिल 2023 ते 31 मे 2023 हा कालावधी ठरवण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.


शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी रद्द


शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी रद्द करण्यात आली आहे. आजची तारीख मागच्या वेळी कोर्टाने दिली होती. पण कामकाजात प्रकरणाचा समावेश नाही. सत्तासंघर्षाच्या निकालानंतरच चिन्हाबाबत कोर्टाची पुढची भूमिका ठरण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण शिंदेंना देण्याचा जो निकाल दिला त्या विरोधात ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेचा निकाल लागेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला वापरता येणार आहे.


औरंगाबाद जिल्हा नामांतराविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात  सुनावणी


औरंगाबादच्या नामांतरामागे  कुठलेही राजकीय कारण नाही, अस राज्य सरकारतर्फे मागील सुनावणी वेळी कोर्टासमोर सांगण्यात आलं होतं. औरंगाबाद जिल्ह्याच नाव बदलण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आणि त्यानंतर केंद्र सरकारने काढलेल्या अधिसुचनेला आव्हान  देणार्‍या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. मात्र राज्य सरकारने वेळ मागीतल्याने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने औरंगाबाद नामांतर विरोधातील याचिकेवर सुनावणी 24 एप्रिलला निश्‍चित केली आहे. 


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आज 50 वा वाढदिवस


सचिनच्या चहात्यांकडून देशभर आनंदात वाढदिवस साजरा केला जाणार आहे. 


राहुल गांधी यांच्यासंबंधित पाटना न्यायालयात सुनावणी


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर पाटना उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार असून, त्यात पाटनाच्या आमदार-खासदार यांनी न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना 25 एप्रिलला हजर राहण्यास सांगितले आहे. एका सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले होते की, सगळे मोदी चोर आहेत. या टिप्पणीच्या आधारे भाजप नेते सुशील मोदी यांनी 2019 मध्ये राहुल गांधींच्या मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत तक्रार दाखल केली होती.


कोर्टातील सुनावण्या 


मुंबई सत्र न्यायालयात दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर सुनावणी.  व्यावसायिक सदानंद कदम आणि तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यां दोघांच्या जामीन अर्जांवर आज  सुनावणी होणार आहे. कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर सदानंद कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, मात्र मुंबई सत्र न्यायालयात विशेष पीएमएलए कोर्टात न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समोर होणार सुनावणी.


जेईई परीक्षेनंतरही अभियांत्रिकी प्रवेशासाठी परसेंटाईल सक्तीचं केल्याच्या मुद्दावर आज हायकोर्टात सुनावणी. मागील सुनावणीच्यावेळी केंद्रीय परिक्षा संस्थेला (एनटीए) आपलं उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता, त्या अनुशंगाने मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी...  प्रवेशासाठी नव्यानं तयार करण्यात आलेली पर्सेंटाईल पद्धती आणि त्यातील तफावतीवर एनटीए आज आपली भूमिका स्पष्ट करणार... आयआयटीकरता प्रवेश परिक्षा असतानाही बारावीत 75 टक्के गुण बंधनकारक कशासाठी ? याचिकेत अस  सवाल करण्यात आला आहे.