Sanjay Raut on Shivsena and MNS Alliance: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरूच आहे. त्यांनी गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये तब्बल चार वेळा भेटीगाठी केल्या आहेत. त्यामुळे शिवसेना आणि मनसे युती जवळपास निश्चित असल्याचे राजकीय पटलावरती बोललं जात आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचा महत्त्वाचा भाग असल्याने शिवसेना मनसे युतीला मान्यता देणार का? असाही प्रश्न चर्चिला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून युती संदर्भात हायकमांडकडून निर्णय घेतला जाईल, असं काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता शरद पवार यांची भूमिका काय असेल यासंदर्भात सुद्धा चर्चा होत आहे. मात्र ही चर्चा खंडित करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या युतीसाठी शरद पवार अनुकूल असल्याचे म्हटलं आहे.
तर पवारांना काहीच अडचण नाही
शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर पवारांना काहीच अडचण नसल्याचे संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. ते म्हणाले की राज आणि उद्धव एकत्र आल्यास शरद पवार यांना काही अडचण नाही. कारण त्यांना महाराष्ट्राच्या भावना माहीत आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या भूमिकेविषयी नेत्यांना विचारलं असता ते म्हणाले की मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय याची माहिती आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाला देतच असतो. त्या संदर्भात माहिती आम्ही राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देत असतो. त्याच पद्धतीने माहिती काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांकडून दिली गेली असेल असे त्यांनी सांगितलं. त्यामुळे युतीची काही अडचण नसल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.
दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थिती लावणार?
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर तब्बल दोन ते तीन तास चर्चा झाली होती. या बैठकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल परब सुद्धा उपस्थित होते. मात्र, संजय राऊत यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचं म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राज उपस्थिती लावणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा सिलसिला सुरु असल्याने दोन्ही बंधू एकत्र येऊन दसरा मेळाव्याला संबोधित केल्यास शिवसैनिकांसह मनसैनिकांसाठी सुद्धा पर्वणी असेल यात शंका नाही.
युतीची घोषणा दसरा मेळाव्यातून?
दरम्यान, राज ठाकरे शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत शक्यता नाकारली असली, तरी काल झालेली प्रदीर्घ बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने काही चर्चा झाली आहे का? किंवा युतीसाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र येत संयुक्त घोषणा करायची का? याचीही उत्सुकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या