मुंबई : सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीच्या वेळी उपस्थित नसलेल्या डॉक्टरवर यापुढे तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली आहे. तसंच संबंधित डॉक्टरचं प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस आरोग्य विभाग करणार आहे, असंही त्यांनी जाहीर केलं.

विधानपरिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांच्या नियम 93 च्या सूचनेला उत्तर देतांना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

सतीश चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा प्रसूतीच्या वेळी डॉक्टर उपस्थित नसल्याने एका महिलेची रुग्णालयाच्या दारातच प्रसूती झाल्याच्या मुद्द्यावरुन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्यावर संबंधित डॉक्टरांवर कारवाईची घोषणा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं असल्याची कबुलीही आकडेवारी देत आरोग्यमंत्र्यांनी आज विधानसभेतील लेखी उत्तरात दिली आहे.